कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून संचारबंदीची आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली. सायंकाळी ठीक सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने शहरातील बहुतांश व्यवहार बंद झाले, त्यानंतर चाकरमान्यांची घरी परतण्यासाठी एकच घाईगडबड सुरू झाल्याने बहुतांश मुख्य रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसू लागली. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करून आदेशाच्या अंमलबजावणीला सुरूवात केल्याचे चित्र दिसत होते.
शहरात शनिवारपासून सात दिवसांसाठी सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत नागरिकांना संचारबंदीचे आदेश करण्यात आल्याचे महापालिका व पोलीस प्रशासनाकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले होते, त्याचे पडसाद शुक्रवारी सायंकाळपासूनच उमटण्यास सुरूवात झाली होती. तर शनिवारी दिवसभर नोकरदार, कामगार, कष्टकऱ्यांना सायंकाळी काम लवकर आटोपून घरी जाण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू होते. दुपारी चार वाजल्यापासूनच शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढण्यास सुरूवात झाली. सायंकाळी सहानंतर संचारबंदी आदेश लागू होत असल्याने, तसेच पोलिसांचा ससेमीरा पाठीमागे नको, म्हणून नागरिकांचा लवकरात लवकर घरी पोचण्याकडे कल होता.
...म्हणून झाली वाहतुक कोंडी !
खासगी कंपन्या, आस्थापना, दुकाने व अन्य ठिकाणच्या कामगारांनी कामाच्या ठिकाणाहून पाच वाजल्यापासूनच निघण्यास सुरूवात केली. त्यामुळे सायंकाळी पाच वाजल्यापासूनच हजारोंच्या संख्येने वाहने रस्त्यावर आली. विशेषतः सहा वाजण्याच्या सुमारास वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली. स्वारगेट, सातारा रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता या प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही गर्दी वाढली होती. काही भागांमध्ये वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्याचेही चित्र होते.
नाकेबंदीच्या ठिकाणी तपासणी सुरू
संचार मनाई सुरु झाल्यानंतर मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलिसांनी नाकेबंदी करण्यास सुरूवात केली होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, वाहतुक पोलीस कर्मचारी नाकेबंदीच्या ठिकाणी थांबले. सायंकाळी सात वाजल्यानंतर पोलिसांकडून नागरीकांकडे चौकशी करण्यास सुरूवात केली. नागरीकांचे बाहेर पडण्यामागील कारण, ओळखपत्र, पत्र, वैद्यकीय कागदपत्रे तपासून सोडले जात होते.
सबळ कारणाशिवाय नागरीकांनी बाहेर पडू नये - पोलीस आयुक्त
संचार मनाई सुरू असल्याने नागरिकांनी सबळ कारणाशिवाय बाहेर पडू नये, रात्रीच्यावेळी बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची वाहतुकीच्यादृष्टीने गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. महापालिकेने काढलेल्या आदेशामध्ये अद्याप स्पष्टता नाही, त्यामुळे योग्य कारण असलेल्या नागरीकांना पोलिसांकडून सहकार्य होईल. परंतू, विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.