पिंपरी - पीएमपी बसने प्रवास करताय? सावधान..! वाहकाने घाईघाईने दिलेले तिकीट हे अधिकृत तिकीट नसून स्वाइप मशिन नादुरुस्त असल्याचे दर्शविणारी ती पावती असू शकते. अशाप्रकारे वाहकाकडून हातचलाखीने ‘नॉट फॉर सेल’च्या वाया गेलेल्या ‘डमी’ कागदाचा तुकडा प्रवाशाच्या हातावर टेकवला जात आहे. या बनावट तिकिटांच्या माध्यमातून पुणे व पिंपरी-चचवडमध्ये पीएमपी वाहकांकडून प्रवाशांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा बनावट तिकिटांच्या माध्यमातून प्रवाशांना लुटणाऱ्या वीस वाहकांवर मागील आठवड्यांत पीएमपी प्रशासनाने निलंबनाची कारवाई करून कसून चौकशी सुरू केली.
बहुतांश प्रवासी तिकीट न पाहताच थेट खिशात ठेवतात. तिकीट ठळक प्रिंट नसल्यास वाहकाला कोणी जाबही विचारताना दिसत नाहीत. मात्र, प्रवाशांना याची किंचितही कल्पना नसते की, वाहकाने आपल्या पैशांवर डल्ला मारला आहे. या माध्यमातून हजारो रुपयांची गंगाजळी वाहकांनी आतापर्यंत हडप केली आहे. पिंपरी व पुण्यामध्ये धावणाऱ्या सर्व बसमधून या तिकिटांच्या स्वाइप मशिनची तपासणी केल्यानंतर हा प्रकार पीएमपी अधिकाऱ्यांच्या लक्षात आला आहे.
वाहकांची शक्कल
अशिक्षित व अज्ञानी प्रवासी पाहून ही शक्कल अनेकदा वाहकांकडून लढविली जाते. पास नसलेल्या ज्येष्ठांनाही अशा पद्धतीचे तिकीट देऊन पैसे उकळले जात आहेत. ग्रामीण मार्गावर तर वाहक बनावट तिकिटावर स्वत:च्या हातानेच रक्कम टाकून पैसे लाटत असल्याचेही उघडकीस आले आहे. तिकिटांच्या पैशात ही रक्कम ग्राह्य न धरता थेट वाहकांचा खिशात जाते. याचा फटका पीएमपीच्या उत्पन्नाला बसतो.
नागरिकांनी तिकिटांची तपासणी करीत राहावी. ठरावीक मार्गावरील बससाठी तिकीट किती आहे, याची विचारणा व शहानिशा प्रवाशांनी करावी. निलंबित केलेल्या वाहकांच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. दोषींना माफ केले जाणार नाही. मात्र, नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
- अनंत वाघमारे, व्यवस्थापक, पीएमपी
‘नॉट फॉर सेल’ तिकीट म्हणजे?
तिकीट स्वाइप मशिनमध्ये बिघाड झाल्यास ट्रायल किंवा डमी तिकीट मशिनमधून काढले जाते. मशिन सुरू आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी ट्रायल तिकिटाचा वापर केला जातो. सध्या प्रत्येक वाहकाला एक अशी आठशे ते एक हजार स्वाइप मशिन आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.