कडूस (पुणे) : शासकीय स्तरावर वृक्षलागवडीचे अनेक 'प्रोग्रॅम' केले जातात. त्याचे पुढे काय होते, हे सर्वज्ञात आहे. आवडच नसेल तर सवड कशी मिळणार? पण आवड असेल तर उघड्या बोडक्या माळरानावर सुद्धा वृक्षवल्ली बहरवली जाऊ शकते, हेच सिद्ध करून दाखवलंय पाईट (ता. खेड) येथील तरुण-तरुणींनी. सोपावस्ती व करंडेवाडी येथील पन्नास पेक्षा जास्त शाळकरी मुले व तरुण तरुणींनी तीन महिने परिश्रम घेत कुंडेश्वराच्या उंच डोंगरावर सुमारे दोन हजार झाडांची लागवड केली आहे.
कोहिंडेच्या कुंडेश्वर डोंगरावर कमी झालेली वृक्षवल्ली पाहून लॉकडाऊनच्या काळात सुट्टीवर आलेल्या पाईटच्या सोपावस्ती व करंडेवाडी येथील नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक, शाळकरी मुले व वन्यप्रेमी मंडळींनी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला होता. दोन्ही वस्त्यांवरील सुमारे पन्नास पेक्षा जास्त तरुण-तरुणींनी एकत्र येत गेल्या तीन महिन्यांपासून दर शनिवारी व रविवारी स्वयंस्फूतीने श्रमदान केले आहे. यातून कुंडेश्वराच्या डोंगरावर वड, भेंडी, पिंपळ, साग, करंज, सुबाभळ, सिताफळ, जांभूळ, आंबा अशा विविध प्रकारच्या एकूण सुमारे दोन हजार झाडांची लागवड केली आहे.
ऐन उन्हाळ्यात रानावनात फिरून तरुणींनी झाडांच्या बिया गोळा केल्या. माती व शेणाचे गोळे तयार केले. त्यात बिया रुजवल्या. म्हणजेच 'सिडबॉल' तयार केले. हे सिडबॉल डोंगरावर जाऊन सर्वांनी ठिकठिकाणी मातीत गाडले. सुकलेल्या झाडांच्या फांद्यांच्या तुकड्यांची पुनर्लागवड केली. या तुकड्यांच्या टोकाला माती व शेणाचे गोळे लावले. सध्या या सिडबॉलमधील बियांचे अंकुर पहिल्या पावसानंतर बाहेर डोकावू लागले आहेत, तर पुनर्लागवड केलेल्या फांद्यांना फुटवा फुटला आहे. यामुळे तरुणांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बिया गोळा करणे, माती-शेणाचे गोळे तसेच सिडबॉल तयार करणे, डोंगरावर खड्डे खोदणे, खड्डयांमध्ये सिडबॉल टाकणे, फांद्यांची पुनर्लागवड करणे आदी कामासाठी परिश्रम घेतलेले संतोष करंडे, निलेश रौधळ, मनोज मेदगे, सचिन रौधळ, अजित रौधळ, धनश्री रौधळ या टीमचे सदस्य आहेत. याबाबत सचिन रौधळ म्हणाले, 'लॉकडाऊनमुळे माझ्यासह अनेक जण गावी आले आहेत. लहानपणी डोंगरावर फिरायला जायचो, मोठ्या प्रमाणात झाडे होती. पण लॉकडाऊनच्या काळात डोंगरावर फिरायला गेलो तर झाडांचे प्रमाण अत्यंत कमी दिसले. मग आम्ही सगळ्यांनी वृक्षलागवड करण्याचे ठरवले. तीन महिन्यापासून परिश्रम घेतले. सिडबॉल तयार करून त्याची लागवड व अन्य काही झाडांची पुनर्लागवड केली. विविध प्रकारची सुमारे दोन हजार झाडे लावली आहेत. सध्या त्याला पालवी फुटली आहे. आवड म्हणून हा उपक्रम राबविला. दरवर्षी हा उपक्रम राबवणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.