PMPML
PMPML sakal
पुणे

PMP Bus : पुणेकरांना फटका! पीएमपीचा प्रवास ‘मंदावलेला’; गुगल, आयटीएमएस, थांब्यांची केवळ चर्चाच

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सरत्या वर्षात प्रवाशांना चांगल्या सेवा देण्यासाठी ‘पीएमपी’ने जे निर्णय घेतले, त्याची पूर्तताच झाली नाही. यात गुगलची सेवा सुरू करण्याची केवळ घोषणाच झाली. हीच स्थिती ‘आयटीएमएस’ची. शिवाय नवीन बसची खरेदी, स्टेनलेस स्टीलचे थांबे, आगारांचा विकास, सिंहगडावर बससेवा सुरू करणे, बीआरटी आदींबाबत पीएमपीचे नियोजन ढिसाळ राहिले. मात्र याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे.

प्रवाशांना पीएमपीच्या बसचे लाइव्ह लोकेशन समजावे, प्रवासाचे नियोजन करता यावे म्हणून पीएमपी प्रशासनाने ‘गुगल’शी करार केला. अनेक बैठकाही झाल्या. या वर्षात कोणत्याही परिस्थितीत गुगलची सेवा सुरू होईल, असे प्रशासनाने सांगितले. पण वर्ष संपत आले तरीही गुगलची सेवा सुरू झाली नाही. प्रवासी अजूनही गुगल सेवेच्या शोधात आहेत.

‘आयटीएमएस’पासून प्रवासी दूर

आयटीएमएस (इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) यंत्रणा काही वर्षांपूर्वी पीएमपीमध्ये सुरू होती. आतादेखील ती काही प्रमाणात सुरू आहे. मात्र ती पीएमपी प्रशासनापुरतीच मर्यादित आहे. याचा कोणताही फायदा प्रवाशांना होत नाही. या प्रणालीमुळे बसमधील प्रवाशांना पुढील थांबा कोणता, कोणत्या थांब्यावर बस उभी आहे, चालकाने कोणत्या थांब्यावर बस थांबवली नाही, बसचा वेग या बाबतची माहिती प्रवाशांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र ही सेवा सुरूच झाली नाही.

लाइव्ह लोकेशनबाबत निर्णयच नाही

गेल्या काही महिन्यांपासून गुगल व पीएमपी यांच्यात बसच्या लाइव्ह लोकेशनसंदर्भात बैठका झाल्या. पीएमपीच्या सुमारे नऊ हजार थांब्यांची व ठिकाणांची माहिती ‘गुगल’ला देण्यात आली. पीएमपीच्या मालकीच्या आणि ठेकेदारांच्या बस यांच्यातील यंत्रणा वेगळी आहे. ही सर्व यंत्रणा एकत्रित करण्याचे काम केले.

पण त्यात यश आले नाही. त्यामुळे प्रायोगिक स्तरावर पीएमपीच्या मालकीच्या ज्या बस आहेत, त्यात तरी लाइव्ह लोकेशन दाखविणारी यंत्रणा बसवावी, अशी मागणी होत आहे. मात्र त्यावर पीएमपीने कोणताच निर्णय घेतलेला नाही.

नवीन बस कागदावरच

पीएमपीमध्ये जरी २०७८ बस असल्या तरीही प्रत्यक्षात १६५० बस रस्त्यांवर धावत आहेत. जून महिन्यांपासून ब्रेकडाउनचे प्रमाण वाढले आहे. रोज सुमारे ६० बस बंद पडत होत्या. त्या वेळी बसच्या फिटनेसचा प्रश्‍न चर्चेला आला. बसचे आयुर्मान १० वर्षांहून १२ वर्षे करण्यात आले. मात्र तरीही बसची कमतरता जाणवत आहे.

नवीन वर्षात ४९० बसेसचे आयुर्मान संपत असल्याने त्या प्रवासी सेवेतून बाद होणार आहेत. यंदा २०० नवीन बस खरेदी करण्याविषयी चर्चा झाली. संचालकांच्या बैठकीत बसखरेदीचा निर्णय झाला. मात्र नवीन बस काही धावल्या नाहीत. सात मीटर लांबीचा विषय मार्गी लागला नाही.

डेपो विकासाच्या निव्वळ गप्पा

‘पीएमपी’ला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएमपीने आपल्या डेपोंचा विकास करण्याचे ठरविले. त्यासाठी १० डेपोंची निवड केली. मात्र प्रत्यक्षात डेपोंच्या जागेबाबत काहीच हालचाली झाल्या नाही. सरत्या वर्षात किमान निविदा प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र तेदेखील झाले नाही. डेपोंचा विकास करून त्याचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे. त्यातून पीएमपीला चांगले उत्पन्न मिळणार आहे. मात्र, ही कामे गतीने होणे अपेक्षित आहे.

बसथांबेही नाहीत

बसथांब्यासाठी पीएमपीची चार वर्षांपासून सुरू असलेली भटकंती सरत्या वर्षात थांबली. बसथांब्यांसाठी सात वेळा निविदा काढली, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. आठव्या निविदेला प्रतिसाद मिळाला. जुलै महिन्यांपासून याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. स्टेनलेस स्टीलचे ३०० थांबे बांधण्याचा निर्णय झाला. मात्र, सहा महिने निविदा प्रक्रियेतच गेले. प्रत्यक्षात एकही थांबा बांधला गेला नाही. प्रवाशांना उन्हाळा व पावसाळ्यात छत्र्या घेऊनच प्रवास करावा लागला.

‘सिंहगड’ला दाखविला कात्रजचा घाट

पर्यटकांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने सिंहगडावर बससेवा सुरू केली. २०२२ मध्ये ही सेवा सुरू झाली आणि अवघ्या १५ दिवसांतच ती बंद झाली. २०२३ मध्ये ही सेवा सुरू करण्याबाबत विचार झाला. मात्र त्या वेळी लहान बस म्हणजेच सात मीटर आकाराची बस दाखल झाल्यावरच ही सेवा सुरू होणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सरत्या वर्षात ना बस आली, ना सिंहगडावर बससेवा सुरू झाली.

नवीन वर्षात काय करणार?

  • बसची संख्या वाढविणार

  • मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना तिकीट काढण्याची सुविधा

  • डबलडेकर बसची सेवा सुरू करणे

  • नवीन ई-बसची खरेदी

बीआरटीचा उलटा प्रवास

वेगवान सेवेसाठी बीआरटीचा वापर होतो. स्वारगेट ते कात्रज सोडले तर अन्य ठिकाणी काही प्रमाणात ‘बीआरटी’ अस्तित्वात आहे. लाखो रुपये खर्चून पुणे व पिंपरी-चिंचवड भागात बीआरटी बांधली. आता हीच बीआरटी कधी वाहतुकीला अडथळा ठरते, तर कधी अपघातप्रवण क्षेत्र ठरत असल्याचा ठपका ठेवून बीआरटी हटविली जाते.

सरत्या वर्षात बीआरटीचा विस्तार झाला नाही, मात्र नगर रस्त्यावरील सुमारे दोन किलोमीटर अंतर असलेली बीआरटी हटविण्यात आली. यासाठी महापालिका प्रशासनाने विविध ठिकाणच्या तुटलेल्या बीआरटीमुळे अपघातप्रवण क्षेत्र निर्माण झाल्याचे सांगितले.

प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नवीन वर्षात पीएमपी अधिकाधिक प्रवासीभिमुख होण्यासाठी प्रयत्न करेल. मोबाईल ॲप, गुगलचे लाइव्ह लोकेशन यांसारख्या सेवेमुळे प्रवाशांना प्रवास करताना नक्कीच फायदा होईल.

- डॉ. संजय कोलते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

पीएमपीने गुगलच्या सेवेची घोषणाच केली. ‘आयटीएमएस’, नवीन बसची खरेदी, स्टेनलेस स्टीलचे थांबे आदींचे नियोजन ढिसाळ राहिले. याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT