पोक्सोंतर्गत गुन्ह्यातील युवकास अटक
पाचगणी पोलिसांची कारवाई; अंबरनाथमधून घेतले ताब्यात
भोसे, ता. ३० : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयिताला पाचगणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सनी गौतम कुचेकर (वय २६, रा. मुगाव, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तांत्रिक तपासाचे आव्हान पेलत पोलिसांनी त्याला अंबरनाथ (जि. ठाणे) येथून ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील एका १२ वर्षे ८ महिने वयाच्या मुलीसोबत संशयित सनी कुचेकर याची ओळख होती. मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही, त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याने मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यातून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी संशयित आपला मोबाईल फोन बंद ठेवून वारंवार ठिकाणे बदलत होता. पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके तयार करून परांडा (धाराशिव) आणि करमाळा (सोलापूर) येथे शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आणि पीडित मुलगी अंबरनाथमध्ये असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने त्याठिकाणी धाव घेऊन संशयिताला अटक केली.
त्यानंतर पीडित मुलीला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संशयित सनी कुचेकर याला न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
कारवाईत पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, उपनिरीक्षक बालाजी सोनुने, रवींद्र कदम, श्रीकांत कांबळे, नीलेश माने, सीमा फरांदे आणि सुमीत मोहिते यांनी सहभाग घेतला.
----------------------------