पुणे

...आता कुठे पोलिसांमध्ये ‘सिंघम’ दिसला

अविनाश चिलेकर

सर्वत्र अंधकार पसरलेला असताना कुठेतरी एखादा कवडसा दिसावा, तसा अनुभव सध्या पिंपरी चिंचवडकर घेत आहेत. खून, खंडणी, दहशतवाद, चोरी, लूटमार, हाणामारी, टवाळखोरी, गुंडागर्दीमुळे शहर बदनाम झाले होते. सर्व सोयींनीयुक्त असे हे सुंदर, समृद्ध शहर राहण्यायोग्य राहिले नव्हते. वाहतूक समस्येने लोक हैराण होते. रोजच्या वाहतूक कोंडीत मेटाकुटीला आलेल्या हिंजवडीतील चार लाख आयटी कर्मचाऱ्यांनी आणि काही उद्योजकांनीही ‘आता पुरे’ची भाषा सुरू केली होती. प्रशस्त रस्ते असूनही रोजचे अपघात सुरूच होते. बेशिस्त वाहनचालकांमुळे शिस्तबद्ध चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत होते. बाहेरून आलेल्या काही मुजोर रिक्षाचालकांमुळे सर्व रिक्षाचालकांची नालस्ती झाली होती. थोडक्‍यात गुन्हेगारी आणि एकूणच वाहतूक समस्येने सर्वसामान्य नागरिकांना नको नको झाले होते, कहर झाला होता. अशा परिस्थितीत आर. के. पदमनाभन्‌ यांच्यासारखा पहिलाच एक ‘सिंघम’ पोलिस आयुक्त शहराला लाभला. त्यांच्या साथीला त्यांची छबी असलेले दुसरे मकरंद रानडे हे अतिरिक्त पोलिस आयुक्त लाभले. दोघांच्या दमदार प्रतिमेचे आणि कार्यशैलीचे मिश्रण झाले. त्यातून कडेलोट होऊ पाहणारे हे शहर आता कुठे वळणावर येऊ लागले. एक प्रामाणिक, कणखर अधिकारी सर्व बदलू शकतो. यापूर्वी दिवंगत टी. एन. शेषन यांनी देशाच्या निवडणूकपद्धतीत सुधारणा करून दाखवली. अगदी अलीकडेच उदाहरण घेऊ. तुकाराम मुंडे यांनी नवी मुंबई, नाशिक हलवले. भ्रष्ट, सडलेल्या पोलिस यंत्रणेकडून लोकांचा भ्रमनिरास होत असतानाच पद्मनाभन आणि रानडे यांच्याकडून काहीसे चांगले काम होताना दिसू लागले. तीच जनतेची अपेक्षा आहे. तोच कवडसा दिसला म्हणून एक हलकासा सुखद धक्का सर्वांना बसला. हे कार्य असेच अखंड राहू द्या म्हणजे झाले. तमाम लोक तुमच्या पाठीशी राहतील याची खात्री बाळगा.

बेशिस्त वाहनचालकांना चाप
शहरातील दुचाकीवर तीन प्रवाशांचा ट्रेंड सुरू झाला होता. सिग्नल तोडण्याचे भय नव्हते. चौक, रस्त्यात पार्किंगमुळे कोंडी होत होती. रिक्षांमधून मेंढरे कोंबावी तसे प्रवासी भरले जात होते. आता हा एकएक प्रश्‍न कायमचा निकाली करण्याचे पोलिसांनी ठरवलेले दिसते. हिंजवडीच्या कोंडीवर एकेरीचा उपाय केला. आता विरोधी दिशेने जाणाऱ्या (नो एन्ट्री) वाहनचालकांची परवाने जप्ती, अडीच-तीन हजार रुपये दंड अशी कारवाई सुरू केली. ‘नो एन्ट्री’तून जाणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे वर्तन होते. या सर्व मंडळींच्या वाहनांचे नंबर पोलिसांनी नोंदविले आणि कारवाईचा धडाका लावला. पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांशी अपघात हे नो एन्ट्रीमधून येणाऱ्या चालकांमुळे झालेत. आता त्यांना आळा बसेल. चौकातील सिग्नलपासून शंभर मीटर अंतरावर एकही वाहन थांबा नको, असे फर्मान नुकतेच काढले. शहरातील ९० टक्के रिक्षा थांबे भर चौकात होते. त्यातून कोंडी होत होती. आता हे सर्व थांबले. सर्व नियम धाब्यावर बसविणारी बिहारी प्रवृत्ती रिक्षाचालकांत वाढीस लागली होती. मिसरूड नसलेली मुले बेफाम रिक्षा चालवत. पोलिसांसमोर सिग्नल तोडून जात. पोलिसांच्या हप्तेखारीमुळे नो एन्ट्रीतून जाण्याचा अघोषित परवानाच त्यांना मिळाला होता. आता एक बाप आल्याने पोलिसांची खाबुगिरी बंद झाल्याचे चित्र आहे. एका रात्रीत सारे बदलणार नाही, पण बदल होतो आहे. चौकीतील पोलिस चौकात दिसू लागला. चौकात कोपऱ्याला बसून वसुली करणारा वाहतूक पोलिस आता कोणास हुज्जत न घालता पावती फाडतो आणि वाहनांचे नंबर नोंदवतो. शहरात आजही मीटरप्रमाणे रिक्षा चालत नाहीत. आता त्या महाभागांवर परवाने रद्द होण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाईत पोलिसांना नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे. आपले नाव गुपित राहणार असल्याची खात्री एकदा मिळाली की, सज्जन मंडळी धाडसाने पुढे येतील. त्यासाठी एक व्हॉटस्‌ॲप नंबर पोलिस देणार होते, तो जाहीर झाली की काळे धंदे, गुंड, गुन्हेगारांच्या विरोधात एक चळवळ उभी राहील. पोलिस खात्यात पद्मनाभन यांच्यासारखे काही ‘सिंघम’ अधिकारी आहेत. अशांना हाताशी धरून कारवाई झाली, चार महिन्यांत हे शहर बदललेले दिसेल. नागरिकांनी एखादी तक्रार केली की आयुक्त स्वतः त्याची तत्काळ दखल घेतात हे आम्ही अनुभवले. त्यामुळे पोलिसांबद्दल एक विश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले. ही फार मोठी जमेची बाजू वाटते. गुंडागर्दीपेक्षा बेशिस्त वाहतूक हेच मोठे आव्हान आहे, हे निश्‍चित. अद्याप भ्रष्टाचाराचा एकही शिंतोडा त्यांच्यावर उडालेला नसल्याने पद्मनाभन, रानडे यांच्याकडूनच ती अपेक्षा आहे. त्यांना शुभेच्छा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT