बालेवाडी (पुणे) : कोरोनाने जगभर थैमान घातले असून पुण्यातही दिवसाला हजारो रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत, असे असताना मुंबई- बंगळूर महामार्गाजवळ बालेवाडी येथील कचरा विलगीकरण केंद्राजवळ व सदानंद हॉटेल जवळील रस्त्यावर कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना वापरत असलेले पीपीई किट, मास्क तसेच फेस शिल्ड आणि रुग्णांना जेवणाचीसाठी दिलेली ताट रस्त्याच्या बाजूला टाकल्याचे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या महिन्याभरात तर रुग्णांची संख्याही चौपट झालेली आहे. शहरांमध्ये रुग्णांना ठेवण्यासाठी रुग्णालय कमी पडू लागली आहेत, त्यामुळे या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे असल्यामुळे महापालिकेकडून तीन महिन्या पासून बालेवाडी परिसरातील निकमार अभियांत्रिकी महाविद्यालय, बालेवाडी स्टेडियम, सदानंद रेजन्सी याठिकाणी कोरोना क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात आले आहेत.
या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी या रुग्णांवर उपचार करीत असताना डॉक्टर, परिचारिका तसेच स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकेचे वाहन चालक यांना संसर्ग होऊ नये म्हणून पीपीई कीट वापरले जाते. रोजच्या रोज हे बदलले जाते. हे किट प्लास्टिक, रेगजीन, कॉटनच्या मिश्रणातून बनवले जाते. प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये हे वापरलेले कीट रोजच्या रोज पास्को एजन्सीकडून गोळा केले जाते व त्यानंतर त्यावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावली जाते. या किट वर 12 ते 14 तास कोरोनाचे विषाणू जिवंत राहू शकतात. महानगरपालिकेकडून हे पीपीई किट या सेंटरला पुरवले जातात. बालेवाडी येथील कचरा विलगीकरण केंद्राजवळ त्याचबरोबर सदानंद हॉटेलजवळ रस्त्यावर पीपीई किट, रुग्णांनी एकदा वापर करण्याची जेवणाची ताट, त्याचबरोबर चेहऱ्यावर वापरायचे प्लास्टिक कव्हर, मास्क हे रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याचे आढळून आले आहे.
अशाप्रकारे वापरलेले किट रस्त्यावरती आढळू लागले तर कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखणार? हा मोठा प्रश्नच आहे. कारण यातूनही कोरोनाचा फैलाव होण्याचा मोठा धोका संभवतो. हे येथे कोणी व का टाकले हे जरी समजले नसले तरी अशा प्रकारे निष्काळजीपणाने या वस्तू अशा टाकणे हे अनेकांच्या जीवावर बेतू शकते. अशाप्रकारे वापरलेले किट रस्त्यावरती आढळल्याने, असा प्रकार इतरत्र होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घेणे अपेक्षित आहे.
सध्या निकमार येथे 969 खाटा उपलब्ध आहेत, तर आज 939 रुग्ण उपचार घेत आहेत. येथे रोज साधारण 50 किट रोज लागतात. येथे डॉक्टर तसेच इतर कर्मचारी वापरत असलेले किट हे साधारण सहा तास वापरतात. त्यानंतर ते एका वेगळ्या मोठ्या जैव वैद्यकीय कचरा ठेवण्यासाठी केलेल्या कंटेनरमध्ये टाकले जातात.
-जयंत कांबळे, निकमार कोविड केअर सेंटरचे निवासी वैद्यकीय अधिकारी.
कोविड केअर सेंटर मधून अशाप्रकारे कचरा बाहेर टाकला जाणे शक्य नाही. कारण या ठिकाणी कर्मचारी, डॉक्टर हे पीपीई किट वापरल्यानंतर याच ठिकाणी काढून जैव वैद्यक कचऱ्यात टाकतात. मगच तिथून बाहेर पडतात. हे किट रुग्णवाहिकेचे वाहन चालक यांच्याकडून अशा प्रकारे बाहेर टाकल्याचा मला दाट संशय वाटतो. हे सर्व टाकलेले किट त्वरित उचलून घेण्यास सांगितले आहे. या गोष्टी कोणी टाकल्या आहेत याचा तपास करण्यास सांगितले आहे.
-जयदीप पवार, सहाय्य्क आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.