पुणे

मेट्रोचे काम सुरू आहे- तिकडे अन्‌ इकडेही

नंदकुमार सुतार

पुणे - पुणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि बहुचर्चित प्रवासी वाहतूक प्रकल्प ‘पुणे मेट्रो रेल्वे’चे काम सुरू झाले खरे; परंतु या कामाचा वेग किती आहे आणि किती असायला हवा? जर प्रकल्प नियोजनानुसार २०२१ पर्यंत पूर्ण करायचा असेल तर सध्याची गती पुरेशी आहे का? याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. 

या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा पहिला मार्ग म्हणून ‘महामेट्रो’च्या ‘पुणे मेट्रो’ संकेतस्थळाला भेट दिली. त्यात ‘अपडेट’मध्ये जाऊन जुलै २०१७ मध्ये काय कामे झाली? याचा धांडोळा घेतला तेव्हा मोठी रंजक माहिती मिळाली. जुलैच्या यादीत सहा घडामोडींचा समावेश आहे. त्यात नाशिक फाटा येथील पिलरच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्याचा उल्लेख आहे. बाकी माहिती आहे ती अधिकाऱ्यांची अमुक भेट, तमुक पत्रकार परिषद या स्वरूपाची.  

संकेतस्थळावर अन्यही बरीच माहिती आहे. छायाचित्रांच्या दालनात डोकावले असता, नाशिक फाट्यावरील पिलरचे काम वगळता इतर छायाचित्रे कार्यक्रमांबाबत आढळून आली. गेल्या २४ डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आणि नंतर हे काम महामेट्रो कंपनीकडे सोपविण्यात आले. तेव्हापासून पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या साडेसोळा किलोमीटरच्या मार्गावर एक पिलर पडला आहे. गाजावाजा मात्र जरा जास्तच दिसून येतो.

उदाहरण दुसरे...
‘महामेट्रो’च्या वेबसाइटमुळे अन्य शहरांतील मेट्रो प्रकल्पांच्या वेबसाइटबाबत जिज्ञासा जागृत झाल्याने गेल्याच वर्षी लंडनमध्ये सुरू झालेल्या नव्या ‘एलिझाबेथ लाइन’ची माहिती देणाऱ्या ‘क्रॉसरेल’च्या वेबसाइटचा फेरफटका मारला. पश्‍चिम आणि पूर्व लंडनला जोडणारी ही लाइन आहे. ‘डिसेंबर २०१८ पासून जनतेच्या सेवेत रुजू’ अशी घोषणाच ‘क्रॉसरेल’ने केली आहे. शिवाय, जेथे काम सुरू केले आहे तेथे ‘वर्क अंडर प्रोग्रेस’ सोबत ‘डिसेंबर २०१८ पासून नवी लाइन सुरू’ असे स्पष्टपणे लिहिले आहे. हा मार्ग २१ किलोमीटरचा आहे आणि सर्व भुयारी. एवढेच काय मार्गावरील सर्व स्टेशनची माहिती, तेथील सुविधांसह दिली आहे आणि दोन स्टेशनमधील अंतर किती आणि मेट्रोने जाण्यासाठी किती वेळ लागणार, याची माहिती दिली आहे. या लाइनला जोडणाऱ्या अन्य लाइनवरील स्टेशनपर्यंत येथून जाण्यासाठी नेमका किती वेळ लागेल, पूर्वीपेक्षा किती वेळ वाचले याची माहिती देण्यासाठी खास ‘कॅल्क्‍युलेटर’सुद्धा वेबसाइटवर दिला आहे. 

दोन्ही वेबसाइटला भेटी दिल्यानंतर कोणीही आपसूकपणे तुलना करायला लागतो. ‘एलिझाबेथ लाइन’ची वेब पाहिली असता आपली नवी मेट्रोलाइन नेमकी कशी असणार याचा पूर्ण अंदाजच येतो, नव्हे तर तुमचा ‘व्हर्चुअल’ फेरफटकादेखील होतो. अन्‌ आपल्या मेट्रोची वेबसाइट पाहिली असता काहीही समजत नाही, अशीच भावना नेटकऱ्यांची होईल.

तुलना कशाला?
कुठे लंडनची मेट्रो आणि कुठे आपली, तुलना कशाला करायची, हा प्रश्‍न मनात येऊ शकतो. कदाचित तो बरोबरही असेल. पण कामाची प्रगती आणि लोकांना वस्तुस्थितीची माहिती देणे एवढे तरी ‘महामेट्रो’ला करता येईल की नाही? केवळ ‘मेट्रोचे काम वेगात’ अशी वातावरणनिर्मिती करून जनतेपासून वस्तुस्थिती लपविणे कितपत योग्य आहे? पुण्यामध्ये मेट्रोरेल उभी करणे अत्यंत कठीण काम आहे, हे खरेच आहे. परंतु कामाचा वेग वाढवता येणे शक्‍य आहे ना ! एलिझाबेथ लाइन २०१८ पासून सुरू होणार, असे ‘क्रॉसरेल’ ठामपणे सांगू शकते आणि तसे मोठे बोर्ड काम सुरू असलेल्या ठिकाणी लावते, एवढेच नाही तर त्या बोर्डावर ‘निर्धारित वेळेत आणि ठरलेल्या बजेटमध्येच काम पूर्ण’ असा उल्लेख अभिमानाने करू शकत असेल, तर आपल्या कामाचा आवाका लक्षात घेऊन जनतेला अशा स्वरूपाची माहिती देणारे बोर्ड लावण्याचे धाडस आपण दाखवणार आहोत का? ‘पुणे मेट्रो : काम सुरू’ एवढ्या माहितीफलकाने आता भागणार आहे का? जेवढी पारदर्शकता आणि वेग पुणे मेट्रोच्या कामामध्ये येईल तेवढा जनविश्‍वास दुणावणार आहे.
लंडनच्या एलिझाबेथ लाइनच्या कामाची बरोबरी आपण करू शकत नसलो, तरी त्यातून काही गोष्टी निश्‍चितपणे घेता येणार आहेत. जगात मलेशियासारख्या विकसनशील देशांमध्येही मेट्रोचे जाळे विणले जात आहे.

त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आपणदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवून काम सुरू केले आहे, त्यामुळे मेट्रोच्या कामाचा वेग आणि दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावरचाच राहील, अशी पुणेकरांनी अपेक्षा ठेवली तर काय चुकले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘देवीचा अवतार घेऊ पाहिलं आणि स्टेजवरच अपमान झाला!’ ममता कुलकर्णीचा व्हिडिओ तुफान व्हायरल!

Nashik Elections : मतदारयादीत मनमानीला चाप; आयोगाचे प्रभागनिहाय याद्यांसाठी कठोर निर्देश!

Nagpur News: नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून संपवलं जीवन; पती-पत्नीसह तीन मुलांचा समावेश, का घेतला असा निर्णय?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुण्यात बॅनरबाजी

SCROLL FOR NEXT