कँटोन्मेंट : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून टप्प्याने आंदोलन करून यश संपादित केले आहे. मुलींच्या पहिल्या शाळेच्या स्मारकाचा मार्ग ज्या पद्धतीने मोकळा झाला, त्याच पद्धतीने महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग आनंदाने मोकळा व्हावा. फुले स्मारकासाठी आगामी काळात निधी उपलब्ध न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिला.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांचा १३३ वा स्मृतीदिन आणि समता दिनानिमित्त यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार प्रसिध्द विचारवंत आणि लेखक संजय आवटे यांना छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून भुजबळ बोलत होते. रूपये एक लाख, महात्मा फुले पगडी, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महात्मा फुले स्मारकाच्या समता भूमी येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर समीर भुजबळ, पंकज भुजबळ, रूपाली चाकणकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष प्रीतेश गवळी, प्रदेश महिला अध्यक्षा मंजिरी धाडगे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, पुणे महानगर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, शब्बीर अन्सारी, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, रवींद्र धंगेकर, दिलीप कांबळे, वैशाली बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
tips
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात अलीकडे नवीनच वर्णव्यवस्था अस्तित्वात येऊ पहात आहे. मी कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. हक्कासाठी लढण्याचा प्रत्येक समाजाचा अधिकार आहे. परंतु, गावबंदीसारखे मार्ग अवलंबून कोणी हक्कांवर गदा आणू पहात असेल, तर त्याविरोधात आम्ही आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला कोणाशीही भांडायचे नाही, पण आमच्या हक्कांवर कोणी गदा आणि गंडांतर आणणार असेल, तर आम्ही शांत बसणार नाही.
यावेळी पुरस्काराला उत्तर देताना संजय आवटे म्हणाले की, माझा परिवर्तनावर विश्वास असून सातत्याने त्या दिशेने प्रयत्न होत राहिल्यास परिवर्तन घडून येते, हा माझा अनुभव आहे. आज मला मिळालेल्या या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून जातीअंताच्या दिशेने माझा प्रवास सुरू असल्यामुळे मला हा पुरस्कार मिळाल्याचे मी गृहित धरतो.
जातीअंताच्या दिशेने वाटचाल होणे अपेक्षित असताना जातीय अस्मिता अधिक बळकट आणि टोकदार होत असून त्या उफाळून येत आहेत. महापुरूषांना जातीच्या चौकटीत अडकवून त्यांचे कार्य आणि कर्तृत्व संकुचित करण्याचा प्रयत्न होत आहे. यावेळी प्रीतेश गवळी यांनी स्वागत केले. नागेश गवळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. प्रा.गौतम बेंगाळे यांनी मानपत्र वाचन केले. पंढरीनाथ बनकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.