पुणे

ज्ञानाच्या शोधात; समाधानात राहा : अभिजित पवार

सकाळवृत्तसेवा

पुणे - ज्ञानाच्या शोधात आणि समाधानात राहा, असा कानमंत्र ‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि डिलिव्हरिंग चेंज फोरमचे संस्थापक अभिजित पवार यांनी आज येथे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आणि नवउद्योजकांना दिला. ‘स्टे वाइज; स्टे सॅटिस्फाइड,’ अशी यशाची नवी व्याख्या करताना श्री. पवार यांनी, ‘यश समाजाच्या भल्याशी जोडले पाहिजे,’ असे आग्रहाने सांगितले. ‘आपण जो काही व्यवसाय, उद्योग करू, त्याचा फायदा समाजाला झाला पाहिजे आणि समाजाचे भले झाले पाहिजे, अशी भूमिका ठेवा,’ असे आवाहनही त्यांनी केले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आणि भाऊ आंत्रप्रेन्युअरशिप सेलतर्फे आयोजित दोन दिवसांच्या ‘पुणे स्टार्टअप फेस्ट २०२०’च्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

‘सीओईपी’चे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, ‘ओला’चे वरिष्ठ सल्लागार डॉ. श्रीनिवास चंद्रू, पॉल कॅबचे विभागीय व्यवस्थापक हितेन कोल्हे, डॉ. एम. जी. कर्णिक, विद्यार्थी प्रतिनिधी जागृती जेठवानी या वेळी मंचावर उपस्थित होते.

‘स्टार्टअपमध्ये अपयशाला घाबरू नका,’ असे सांगताना पवार म्हणाले, ‘‘लहानपणी तुम्ही सायकल चालवायला शिकता, तेव्हा ठेचकाळता, पडताही; पण प्रयत्न करणे तुम्ही थांबवत नाही. स्टार्टअपचेही असेच आहे. सुरुवातीला यश मिळाले नाही म्हणून घाबरून जायचे कारण नाही. सातत्याने प्रयत्न करीत राहिले पाहिजे.’’

‘‘तुम्ही जो काही व्यवसाय सुरू करता, त्याचा फायदा समाजाला झाला पाहिजे’’, अशी भूमिका मांडताना ते म्हणाले, ‘‘तुम्ही दुचाकींचा व्यवसाय सुरू केला आणि इंधनामुळे प्रदूषण होऊन समाजाचे दीर्घकालीन नुकसान होते आहे, असे लक्षात आले किंवा रस्ते बांधतो आहोत, म्हणून झाडे कापून टाकतो आहोत, तर तुम्हाला तातडीने ॲक्‍शन घेता आली पाहिजे. तुमच्या व्यवसायाचे कल्याण होते आहे म्हणून दुसऱ्याचे नुकसान करता कामा नये. समतोल बिघडवता कामा नये.’’

श्री. पवार म्हणाले, ‘‘प्रत्येक जण अब्जाधीश उद्योगपती होईलच असे नाही; मात्र, तुमच्यामध्ये जी कुवत, क्षमता आहे, ती तुम्ही पूर्णपणे वापरत आहात का, याचा विचार करा. व्यवसाय किंवा उद्योग म्हणजे समाजातील प्रश्नांवर शोधलेले उत्तर - सोल्युशन असते. तुम्ही जागतिक पातळीवरील प्रश्नांवर उत्तर शोधले, तर तुमचा उद्योग जागतिक होईल; स्थानिक प्रश्नांवर शोधले, तर स्थानिक वाढ होईल. नोकरी केलीत तरी चालेल; मात्र, सोल्युशन्स शोधत राहिले पाहिजे.’’

‘काहींना बुद्धिमत्तेची देणगी असते. कोणत्याही अपयशाविना ते करिअरचे टप्पे गाठतात. एखादे संकट कोसळले तर तेही कोसळण्याची शक्‍यताच जास्त असते. कारण, त्यांनी कधी अपयशाशी सामना केलेला नसतो. करिअरमध्ये आधी अपयश आले तर येऊ द्या; ते चांगले असते. आई-वडिलांनीही मुला-मुलींना प्रयत्न करू द्यावेत. फक्त, ते जे काही करत आहेत, ते नैसर्गिक आहे; त्यामध्ये अनैसर्गिक काही नाही, याचे भान पालकांनी ठेवावे, असे आवाहन त्यांनी पालकांना केले.

‘स्टे वाइज; स्टे सॅटिस्फाइड’, अशी यशाची नवी व्याख्या सांगताना श्री. पवार यांनी आयुष्यभर ज्ञानाच्या शोधात राहिले पाहिजे, असा विचार मांडला. ‘आधी आपण ठरवले पाहिजे, की मी आयुष्यभर विद्यार्थी राहीन. विद्यार्थी म्हणजे रोज नवीन ज्ञान प्राप्त करणारा. शिवाय, जे मिळते आहे, त्यात समाधान शोधले पाहिजे. स्टे हंग्री; स्टे फुलिश यापेक्षा मला ‘स्टे वाइज; स्टे सॅटिस्फाइड’ महत्त्वाचे वाटते. याचा अर्थ असा नव्हे, की उद्योगाचा विस्तार करायचा नाही; तो केलाच पाहिजे; मात्र आपली कंपनी युनिकॉर्न बनलीच पाहिजे, हा हट्ट नको. लाखो कंपन्या सुरू होऊन बंद पडतात; तेव्हा एखादी युनिकॉर्न कंपनी चालते. हंग्री राहण्याच्या घाईत आयुष्याच्या प्रवासाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे, वाइज आणि सॅटिस्फाइड राहणे  महत्त्वाचे आहे.’

तुमच्यामध्ये समाजातील समस्या सोडविण्याचा आत्मविश्‍वास असल्यास उद्योगात यशस्वी व्हाल. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने वेळेची शिस्त व पैशाची बचत स्टार्टअपसाठी महत्त्वाची आहे.
- डॉ. श्रीनिवास चंद्रू, वरिष्ठ सल्लागार, ओला

स्टार्टअप, नवउद्योजक, विद्यार्थ्यांसाठी पंचसूत्री
स्वतःला आयुष्यभर विद्यार्थी समजा; ज्ञानाच्या शोधात राहा
स्थानिक असो किंवा जागतिक; समस्यांवर सोल्युशन शोधत राहा
अपयशाला घाबरू नका; लढण्याची तयारी ठेवा
समाजाच्या कल्याणाचा विचार केंद्रस्थानी ठेवा
मोजता येतील, असे चांगले बदल कामातून समाजात घडवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT