पुणे : "आधुनिक तंत्राचे स्वागत करताना पारंपारिक पाढे विसरता कामा नयेत. पाठांतराची परंपरा अभ्यासातून कमी झाली तरी पाठांतराला दुय्यम लेखता कामा नये," असे मत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी व्यक्त केले.
शालेय विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी यासाठी राज्य शासनाच्या राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 'राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे उदघाटन देसाई यांच्या हस्ते मंगळवारी झाले. ऑनलाइनद्वारे झालेल्या या उदघाटन सोहळ्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते. मराठी परंपरा संवर्धनासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील, प्रशासकीय अधिकारी गिरीश पतके, मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार नामजोशी, मराठी भाषेचे अभ्यासक अनिल गोरे आदी सहभागी झाले होते.
देसाई म्हणाले,"गणिताची गोडी वाढविण्याचा अंकनादचा प्रयत्न स्तुत्य आहे. आपल्या जीवनात अंक आणि नाद अपरिहार्य आहेत. पूर्वी शाळांमध्ये प्रार्थना, पाढे होत असत. त्यामुळे मुलांना सवय होती. त्या काळात सूर, ताल साथ करीत असत. घंटानाद ,जनावरांच्या गळ्यातील घंटाचा नाद हे भाव विश्व होते .
कवितेचे ,गणिताचे नाद आणि तालाचा पाठिंबा असायचा. आता किती शाळात पाढे म्हणून घेतले जातात, असा प्रश्न आहे. शैक्षणिक विश्व डिजिटल झाले आहे . जुन्या पिढीला निमकी, अडीचकी, पावकीची परीक्षा असायची. हिशेब करताना या पाठांतराचा फायदा होतो. जुनेपणाचा शिक्का मारून पाढे दूर लोटू नका."
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
डॉ. करमळकर म्हणाले, "लयबद्ध माध्यमातून गणित पुढे जाण्याचा प्रयत्न होतो आहे. गणित आपल्याला अवघड वाटते. गणित योग्य पद्धतीने शिकवले गेले तर त्याचा आयुष्यभर उपयोग होतो. आज अल्गोरिदम लिहायला गणिताचा उपयोग होतो. अनेक विद्यार्थी भीतीपोटी गणितापासून दूर जातात. गणित हा घाबरण्याचा विषय नाही.''
गोरे म्हणाले,"आपल्या ७० टक्के संभाषणाच्या वाक्यात संख्या,अंक येतात. विद्यार्थी ते विक्रेते या वर्गाला अंकनाद ,पाढे पाठ आहेत. त्यांना अवघ्या काही सेकंदात आकडेमोड करता येते. कागदावर हिशेब आणि गणकयंत्र वापरायची गरज नाही. आपला वेळ वाचवायचा असेल तर अंक,पाढे ,पावकी –निमकी –अडीचकी पाढे उपयोगी पडतात." अनिल गुंजाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.