Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule
Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule 
पुणे

अजितदादांची ‘वाट’ नेमकी कोणत्या दिशेला?

संभाजी पाटील

राज्यात सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीत ‘सारं काही आलबेल आहे,’ अशी परिस्थिती असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनपेक्षित निर्णयाचा ‘जोर का झटका’ राष्ट्रवादीसह आघाडीतील अन्य पक्षांना बसला असला, तरी दादांचा हा शॉक त्यांनाच पुन्हा बसणार की काय, असा राजकीय घटनाक्रम सध्या पाहायला मिळतोय. पुणे शहर आणि जिल्ह्यात अजित पवार यांचा दबदबा आहे खरा; पण डोक्‍यावर असणारा शरद पवारांचा हात बाजूला झाला तर त्यांना किती पाठिंबा मिळेल, याबाबत साशंकता आहे. बहुमत सिद्ध झालं काय किंवा नाही झालं काय, स्वपक्ष सोडून जाण्याच्या त्यांच्या या निर्णयाचे राज्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम होणार, हे मात्र नक्की !

महिनाभरापासून राज्यातील राजकारण नेमक्‍या कोणत्या दिशेला जाणार, याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाही. महाराष्ट्रातील जनतेसाठी सत्तेचा रोज नव्याने मांडण्यात येणारा हा राजकीय खेळ कमालीचा धक्कादायक आणि राजकारणाविषयी तिडीक वाढविणारा ठरला आहे. राष्ट्रपती राजवटीनंतर दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेची ‘महाविकासआघाडी’ सत्तेवर येणार असे वाटत असताना दादांनी स्वत:च्या पक्षाला दिलेला धक्का अगदीच अनपेक्षित ठरला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवारांच्या वैयक्तिक निर्णयाला पक्षाचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता सगळीच राजकीय समीकरणे बदलली आहेत.

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा अजित पवार यांच्यासोबत राहणार की शरद पवार यांच्यासोबत या प्रश्‍नाचे उत्तर सध्यातरी शरद पवार यांच्यासोबत असे आहे; पण राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यातील अजित पवारांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. राष्ट्रवादीमध्ये दादांच्या निर्णयाने पडलेली ही फूट वाढणार की शरद पवार पुन्हा एकदा पक्ष सावरून नेणार, हे ‘सत्ता नेमकी कोणाकडे’, यावरही अवलंबून राहणार आहे.

राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, असा अंदाज वारंवार व्यक्त केला जात होता. पवार कुटुंबीयांमध्ये वाद आहेत, यावरही तर्कवितर्क लढविले जात होते. लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांची निवडणूक न लढविण्याची घोषणा, पार्थ पवार यांना मावळमधून मिळालेली उमेदवारी, ‘ईडी’च्या चौकशीवेळी अजित पवार यांनी अचानक दिलेला राजीनामा, शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी बोलावलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीदरम्यान ‘मी बारामतीला निघालोय’, असे सांगून दादांचे बैठकीपूर्वीच बाहेर पडणे, या सर्व घटनांचे संदर्भ आणि अर्थ आता लावले जातील. दादांच्या अशा वागण्याचे त्या वेळी पडलेले कोडेही आता अनेकांना सुटले असेल; पण त्यांचा या पुढील राजकीय प्रवास खडतर असणार, हे मात्र नक्की. 

पुणे शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक दहा आमदार विजयी झाले आहेत. यातील दिलीप वळसे-पाटील वगळता सर्व जण अजित पवार यांचा शब्द मानणारे आहेत; पण शरद पवार यांना सोडून दादांसोबत जाण्याची धारिष्ट यातील कोणी दाखवेल, अशी राजकीय स्थिती सध्यातरी नाही. पुण्यातील सुनील टिंगरे आणि चेतन तुपे हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. टिंगरे हे सुरुवातीस दादांसोबत राहतील असे वाटत होते; पण त्यांनीही आता पक्षासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. तुपे हे शरद पवार यांना मानणारे आहेत, त्यामुळे त्यांचाही प्रश्‍न येणार नाही. अजित पवार यांना मानणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी, कोणीही उघडपणे त्यांच्यासोबत जातील असे वाटत नाही. त्यामुळे दादांचा सत्तेत सहभागी होताना नेमका आकड्यांचा खेळ काय होता, हे स्पष्ट होत नाही. दादांचे आमदार जोपर्यंत उघडपणे समोर येणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या सत्तास्थापनेतील सस्पेन्स कायम राहणार आहे.

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादीची पडझड होणार नाही, याची काळजी स्वत: शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे घेतील यात शंका नाही. प्रश्‍न आहे तो अजित पवार यांनी टाकलेल्या पावलाचा. त्यांचे हे पाऊल भाजपला सरकार मिळवून देणार की राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद वाढविणार? हे लवकरच स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT