तळेगाव स्टेशन - देहूरोड, तळेगाव वाहतूक नियंत्रण शाखेच्या आशीर्वादाने आणि पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे तळेगाव दाभाडे परिसरात शेकडो खटारा आणि मुदतबाह्य मिनीडोअर, मॅजिक, तीनचाकी रिक्षांमधून धोकादायक पद्धतीने अवैध प्रवासी आणि मालवाहतूक होत असल्याने रस्तासुरक्षा धोक्यात आली आहे.
शहरी भागात बंदी घातलेल्या आणि प्रदूषणामुळे कंपन्यांनी बंद केलेल्या किमान २५ वर्षे जुन्या सहा आसनी मिनीडोअर, तीनचाकी रिक्षा तसेच जुनी मालवाहू वाहने तळेगाव दाभाडे परिसरातील महामार्गावरून व तळेगाव ते सोमाटणे, वडगाव, चाकण, एमआयडीसी मार्गांवर रोज धावतात. मुदत संपल्याने ती धूर सोडत, मोठा आवाज करत पोलिसांसमोरून जातात. विना परवाना, विना इन्शुरन्स, विना फिटनेस धावणारी अशी वाहने अपघात आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतात. बहुतांश वाहने भाडेतत्त्वावर अथवा शिफ्ट बेसिस रोजंदारीवर दिली आहेत. बहुतांश चालक मद्यपान करून विनापरवाना ते चालवितात. अपघात झाल्यास प्रवाशांना भरपाई मिळत नाही. वाहन पकडल्यास मालक अथवा राजकीय वजन वापरून सोडविली जातात. वाहतूक पोलिस कारवाई न करता आरटीओकडे बोटे दाखवत सोडून देतात. त्यामुळे बेकायदा आणि मुदतबाह्य वाहनांना तळेगावात कुठला नियम लागू होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
बाजाराच्या दिवशी कोंडी
तळेगावात रविवारी बाजाराच्या दिवशी जिजामाता चौक आणि मारुती मंदिर चौकात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांमुळे होणारी कोंडी त्रासदायक ठरते. नागरिकांनी मागणी करूनही पोलिसांना याबाबत गांभीर्य नाही. भर चौकात, रस्त्यावर रिक्षा लावून प्रवासी भरणाऱ्या रिक्षाचालकांना पोलिस हटकत नाहीत. ठरवून दिलेल्या जागेऐवजी त्या रस्त्याकडेला पार्क केल्या जातात.
बेकायदा रिक्षाचालकांची चलती
अनेकांकडे वाहनाचे फिटनेस, परमीट, विमा, पीयूसी प्रमाणपत्र नाही. परराज्य, परजिल्ह्यातील पासिंग असलेले आणि स्क्रॅप झालेले अनेक ट्रक तळेगाव चाकण औद्योगिक पट्ट्यात मालवाहतुकीसाठी बेकायदेशीरपणे आणि धोकादायक पद्धतीने वापरात आहेत. याकडे वाहतूक पोलिस डोळेझाक करतात. परमिटधारक रिक्षाचालकांवर मात्र उपाशी राहण्याची वेळ येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.