jejuri-valhe.jpg 
पुणे

चला वारीला : कुठे गाव भक्तीचे ना कळे, कोमेजले शेतमळे

शंकर टेमघरे

Wari 2020 : जेजुरी- वाल्हे हा सर्वांत कमी अंतराचा टप्पा. मात्र, पालखीची निघण्याची वेळ तीच असते. सर्व जण जाताना मनोमन खंडोबाचे दर्शन घेतात. आधी पालखी गावात मुक्कामी असायची. पण तेथे जागा कमी पडू लागल्याने आता तळ गावाबाहेर गेला आहे. अर्थात ही येथे केलेली तात्पुरतीच व्यवस्था आहे. पाऊस पडला की, या तळाची अवस्था वाईट होते. तसेच गावाबाहेर तळ असल्याने जेजुरीकरांना दर्शनाला जाण्यासही अडचणीचे होते. पण माऊलींच्या प्रेमाच्या ओढीने येतात सारे जण दर्शनाला. पालखी मार्गावर न्याहारीचे सर्वांत चांगले ठिकाण कुठले असेल, तर ते दौंडज खिंड. कोवळ्या उन्हात वारकरी न्याहरी करतात. जवळपासच्या साऱ्या गावांतील लोक माऊलींच्या दर्शनासाठी येताना पंढरीच्या वाटसरूंसाठी न्याहरी आणायची विसरत नाहीत. कपड्यात बांधून आणलेल्या भाकरी, ठेचा, हुसळ, पिठलं हा बेत येथे न्याहारीसाठी असतो. उजव्या हाताला असलेल्या टेकडीवर वर जाऊन वारकरी परिसराचा आनंद घेतात. डाव्या बाजूला अधूनमधून रेल्वे जाताना उगाच हृदय धडधडते. कोणी वारकरी रुळावरून तर चालत नसेल ना म्हणून. पण सारी काळजी त्या माऊलीला असते. हिरव्यागार शेतशेवारामधून पालखी सोहळा दुपारी अकरा- साडेअकराच्या सुमारासच वाल्ह्यात येतो. आधी तळ गावातच होता. तो कमीच कमी पडत होता. त्यामुळे गावाबाहेर एका दानशुराने जागा दिली. त्यातून भव्य तळ येथे उभा राहिला आहे. गावाबाहेर असल्याने गावकऱ्यांना थोडे लांब पडते. पण वारकऱ्यांची मुक्कामाची चांगली सोय झाली आहे, हे नक्की.

पालखी आली, की या छोट्या गावाला भव्य स्वरूप येते. गावात गुढ्या उभारल्या जातात. पण यंदा पालखी नाही. त्यामुळे नेहमीचे ते वाल्हे गाव यंदा भक्तीच्या गावाने फुलले नाही. या छोटेखानी गावात दोन लाख वारकऱ्यांच्या अस्तित्वाने गावाचे रुपडे दहा पटीने वाढते. गावकऱ्यांनी कधीही माउलींच्या या वाटसरूंचा पाहुणचार करायला पुढेमागे बघितले नाही, तरी का कोपली यंदा नियती. गाव ओसाड पडलेय. ज्या गावात चालायला जागा उरत नाही. त्या गावाचा रस्ता सताड रिकामा पडलाय. विस्तीर्ण तळावर माऊलींचा वास नसल्याने मोकळा परिसर खायला उठलाय. तरी गावकरी माऊलींच्या पादुका ज्या ओट्यावर ठेवतात, तेथे पूजा करून माऊलींचे स्मरण, पूजन करताहेत. पण शेवटी ते प्रतिकात्मकच ना...! त्यात माऊलींच्या अस्तित्वाचे चैतन्य कुठेय. माऊली न आल्याने गावाला चुकल्यासारखे वाटत असणार, हे नक्की. कोरोनामुळे सारे जगच शांत झालेय. जेजुरी- वाल्हे मार्गावर हिरव्यागार शिवारांचे तेज हरवले आहे. त्या मार्गावरचे हे एक नेहमीचे छोटे गाव उरले आहे वाल्हे. यंदा माऊलींचे गाव झाले नाही.
पालखी सोहळ्यात नेहमीच एक जाणवत आले. माऊली ज्या गावात जाते. त्या गावातील वातावरण चैतन्याने फुलून जाते. माऊली पुढे गेली, की मागील गावातील ओसाडपण नकोसे वाटते. त्यातूनच माऊलींच्या चैतन्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. अगदी तसेच आज वाल्ह्यामध्ये झालेय. वाल्ह्यासारखी अवस्था मार्गावरील सर्वच गावांची आहे. पण वाल्ह्याला ते जास्त जाणवणार हे नक्की...!

दुपारी येथे समाजआरती येथे असते. वारीची शिस्त काय असते हे समाजआरती पाहिली की समजते. दिंड्या गोलाकार उभ्या राहतात. वारकऱ्यांच्या गर्दीतून वाट काढीत पालखी मध्यभागी येते. दिंड्यांमधून हरिनामाचा गजर सुरू असतो. परंपरेप्रमाणे ठराविक मानकरी पालखीशेजारी उभे राहतात. अन्य कोणी उभे राहात नाही. चोपदार हातातील चोप उंचावून ‘हो’ असे म्हणाले, की लाखो वारकऱ्यांचा सुरू असलेले टाळमृदंगाचा गजर एकदम शांत होतो. एखाद्या दिंडीत टाळ मृदंगाचा गजर सुरूच राहिल्यास समजायचे, त्या दिंडीला काहीतरी अडचण आहे. त्यांची काहीतरी समस्या आहे. मग दुसरे चोपदार त्यांच्याजवळ जातात. त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. त्यांच्या समस्येवर चोपदार त्यांना आश्वासित करतात आणि त्याचे समाधान झाले, की टाळ बंद होतात. त्यानंतर वारीत दिवसभराच्या वाटचालीत कोणाचे काही हरवले असेल किंवा कोणाचे काही सापडले असेल तर त्यांची यादी वाचली जाते आणि कोणाचे असेल त्याने ओळख पटवून ते घेऊन जावे, असे पुकारले जाते. मग त्यामध्ये साध्या कपड्याच्या पिशवीपासून सोन्याच्या मंगळसुत्रापर्यंत सारे काही असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या वाटचालीविषयी वारकऱ्यांना, प्रशासनाला सूचना दिल्या जातात आणि आरती होते.
आरती झाली, की पालखी विसावते. या समाजआरतीमधील भाव बघितला तर असे जाणवते, पालखी तंबूत न जाता बाहेर थांबते, वारकऱ्यांच्या दिवसभरातील अडचणी समजावून घेते, त्याचे निराकरण झाले की मगच ती तंबूत विसावते.

माऊलींना वारकऱ्यांबद्दल असलेली काळजी येथे अधोरेखीत होते. आपल्यासमवेत चालणाऱ्या जिवांना काही समस्या असेल तर ती दूर झाल्याशिवाय मी शांत तंबूत बसू शकत नाही, ही माऊलींची तळमळ वारीतील खरे आध्यात्म शिकवते. आणि इतके वारकरी वीस दिवस कसे इतक्या गुण्यागोविंदाने राहतात, याचे उत्तर मिळायला सुरुवात होते. कारण या लाखो वारकऱ्यांची काळजी ती पालखीत विराजमान असलेली माऊली वाहात असते. हाच सोहळा जेव्हा कोरोना नामक साथीमुळे रद्द होतो, तेव्हा असे वाटते, माऊलीला तिच्या लेकरांना या संकटापासून बाजूला ठेवायचे तर नसेल ना...! देवांनी कवाडे लावून घेतली, ती तर लाखो जिवांची माऊली आहे. ती कशी आपल्या भक्तांना रोगराईमध्ये घेऊन जाईल? यंदाचा हा निर्णय या माऊलीने काळजीने घेतला आहे, असे वारकऱ्यांनी समाजावे. एखादी आई बाहेर काही संकट असेल, तर पोरांना आधी घरात घेते. ही तर अवघ्या विश्वाची मायमाऊली... कशी नेईल अशा महामारीत आपल्या लेकरांना? तिची वारी हीच आपली वारी समजून यंदा वारकऱ्यांनी घरातच बसावे, ही माऊलीचीच इच्छा आहे, हे सत्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medicine MRP Change: औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार! केंद्र सरकारचा नवा आदेश लागू, अंमलबजावणी कधी करणार?

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

Credit Card Scheme: मोदी सरकार देत आहे क्रेडिट कार्ड, मर्यादा ५ लाख रुपये, 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

SCROLL FOR NEXT