बावड्याची माहेरवाशीण पिंपरी- चिंचवडची उपमहापौर
शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड; पारगावसह किकली ग्रामस्थांमध्ये आनंद
खंडाळा, ता. ७ : बावडा (ता. खंडाळा) येथील माहेरवाशीण व किकली (ता. वाई) येथील सासुरवाशीण असलेल्या शर्मिला बाबर यांची पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने पारगाव व किकली ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
याबाबत माहिती अशी, की पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर पदावर भाजपच्या शर्मिला राजेंद्र बाबर यांची बिनविरोध निवड झाली. निगडी- आकुर्डी (पुणे) प्राधिकरणातून नगरसेविका म्हणून त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये शंभर टक्के उपस्थिती व शिक्षण समितीच्या उपसभापती म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
शर्मिला बाबर यांचे माहेर बावडा (ता. खंडाळा), तर वडील (कै.) जयसिंगराव कृष्णाजी पवार यांच्या सुकन्या व नागेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पवार यांच्या ज्येष्ठ भगिनी आहेत. सासर हे वाई तालुक्यातील किकली असून, पती राजेंद्र बाबर कामानिमित्त पिंपरी- चिंचवड शहरात स्थायिक झाले आहेत. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे दिवंगत खासदार गजानन बाबर यांच्यासोबत सामाजिक व राजकीय जीवनात प्रवेश केला.
शर्मिला बाबर पहिल्यांदा २०१७ मध्ये भाजपकडून प्रभाग क्रमांक १५ मध्ये निगडी-आकुर्डी परिसरातून विजयी झाल्या. आताच्या निवडणुकीत प्रभाग १५ मधील भाजपचे संपूर्ण पॅनेल निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता, तर सलग दोन वर्षे त्यांनी प्रभाग अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. या प्रवासात त्यांचे पती आणि भाजपचे मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर यांची त्यांना साथ मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ‘मन की बात’ आणि ‘चाय पे चर्चा’ यांसारखे उपक्रम त्यांनी राबवले आहेत, तसेच पक्षाप्रती निष्ठा म्हणून पदापर्यंत पोहोचले आहे, असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.
----------------------------------
शर्मिला बाबर
05972
----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.