‘शीशमहल’वरून गदारोळाची शक्यता
दिल्लीत अधिवेशनात भाजप सरकार कॅगचे अहवाल मांडणार
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ३० ः दिल्ली विधानसभेच्या तीन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात येत्या पाच जानेवारीपासून होत आहे. आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारच्या कार्यकाळाशी संबंधित पाच महत्त्वाचे महालेखापरिक्षकांचे (कॅग) अहवाल या अधिवेशनात मांडले जाणार आहेत. जे अहवाल मांडले जाणार आहेत, त्यात तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राहत असलेल्या शीशमहल बंगल्याचे जे सुशोभीकरण करण्यात आले त्याच्या संबंधीच्या अहवालाचा समावेश आहे. या अहवालावरून विधानसभेत गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या अभिभाषणाद्वारे अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर ‘कॅग’चे पाच अहवाल पटलावर ठेवले जातील. शीशमहल, दिल्ली जल बोर्ड, मोहल्ला क्लिनिक, जाहिरात धोरण आदी बाबींशी संबंधित हे अहवाल आहेत. ‘शीशमहल’ च्या सुशोभीकरणाचा मुद्दा भाजपने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रतिष्ठेचा केला होता. त्यामुळे ‘कॅग’च्या अहवालातून काय बाहेर येणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शीशमहलचे रुपडे बदलण्यासाठी ७५ ते ८० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा भाजपचा आरोप आहे. तर, ‘‘उधळपट्टी करण्यात आलेल्या पैशाची वसुली केली जाणारच’’ असे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.
दिल्लीत भाजपचे सरकार आल्यानंतर मद्य धोरणशी संबंधित कॅगचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला होता. ‘आप’ सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणामुळे सरकारचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा शेरा त्या अहवालात मारण्यात आला होता. आरोग्य क्षेत्रातही गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी केला होता.