Panchnama Sakal
पुणे

देव देव्हाऱ्यात नाही देव नाही दिवालयी!

‘अगं उद्या मंजिरी व जावईबापू मुलांसह येणार आहेत. मी आताच तालुक्याच्या गावावरून मुलांसाठी कपडे व खाऊ घेऊन येतो.

सु. ल. खुटवड

‘अगं उद्या मंजिरी व जावईबापू मुलांसह येणार आहेत. मी आताच तालुक्याच्या गावावरून मुलांसाठी कपडे व खाऊ घेऊन येतो.

‘अगं उद्या मंजिरी व जावईबापू मुलांसह येणार आहेत. मी आताच तालुक्याच्या गावावरून मुलांसाठी कपडे व खाऊ घेऊन येतो. तोपर्यंत तू घराची साफसफाई कर,’ असे सांगून दिनकरराव पिशवी घेऊन घराबाहेर पडले. आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकताच सुलोचनाबाईंचा चेहरा उजळला. मंजिरी व मुले आल्यानंतर घराचं गोकुळात रुपांतर व्हायचं. कानांना गोड वाटणारी पिंकीची अखंड बडबड ऐकत आणि बंटीचे एकेक कारनामे बघत दिवस कसा जायचा, हे आजी-आजोबांना कळायचंही नाही. दोघांचे हट्ट आणि लाड पुरवता पुरवता आठ-दहा दिवस भुर्रकन निघून जायचे आणि मग मुलांच्या जाण्याचा दिवस उजाडला की त्यांच्या काळजात कालवाकालव व्हायची. दर दोन-तीन महिन्यांनी हे दृश्य हमखास दिसायचं. पहिल्यांदाच सासरी जाताना नववधू आई-वडिलांच्या गळ्यात पडून रडते, अगदी तशीच अवस्था मंजिरीची दरवेळी व्हायची.

सुलोचनाबाईंनी भराभर घर आवरलं. पाण्याने धुऊन फरशी लख्ख केली. मुलांना खेळण्यासाठी अंगण झाडून-पुसून स्वच्छ केले. सायंकाळी दिनकररावांनी मुलांसाठी कपडे, मंजिरीसाठी दोन साड्या व जावईबापूंसाठी शर्ट व पॅंटपीस आणले. दुसऱ्या दिवशी लवकर उठून सुलोचनाबाईंनी दारावर फूलतोरण बांधले. अंगणात रांगोळी काढली व मंजिरीच्या आवडत्या पुरणपोळीचा बेत आखला.

बरोबर अकरा वाजता मंजिरी, नवरा सतेज व मुलांसह आली. गाडीचा हॉर्न वाजताच सुलोचनाबाईंनी हातातील काम बाजूला ठेवून बाहेर धाव घेतली. मंजिरी व मुलांच्या अंगावरून भाकरीचा तुकडा ओवाळला. आल्या आल्या मुलांनी आजोबांच्या मांडीचा ताबा घेतला आणि मागची गुलबकावलीची राहिलेली गोष्ट पूर्ण करण्यास सांगितली. दिनकररावांनीही मुलांचा हट्ट पूर्ण केला. त्यानंतर मुले आजी-आजोबांभोवती बराचवेळ हुंदडत राहिली. सायंकाळी हंडा-कळशी घेऊन मंजिरी घराशेजारील विहिरीवर गेली. पाणी शेंदता शेंदता तिच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली. आठवणींचा पट तिच्यासमोर उलगडला. दहा वर्षांपूर्वी याच विहिरीवर ती आत्महत्या करायला आली होती. दिनकररावांचा एकुलता एक मुलगा संदीपबरोबर तिचं लग्न झालं होतं आणि लग्नानंतर तीनच महिन्यांत त्याचं अपघातात निधन झालं होतं. गावातील लोकं आणि भावकीने तिला पांढऱ्या पायाची ठरवली होती. तिला कोणत्याच कार्यक्रमांना बोलावलं जात नव्हतं. उलट ती दिसली की अनेकजणी तिला टोमणे मारून, घायाळ करत असत. या साऱ्याला कंटाळून तिने आत्महत्येचा मार्ग निवडला होता.

मात्र, त्याचवेळी दिनकररावांनी तिचा जीव वाचवला होता. ‘‘पोरी, हे काय करतेस? मी जिवंत असताना असलं टोकाचं पाऊल उचलतेस? आजपासून मी तुझा सासरा नाही तर वडिल आहे, असं समज. मला लेक नाही, त्याची उणीव तू भरून काढ. मी माझ्या लेकीला काहीही कमी पडू देणार नाही.’’ असे म्हणून दिनकररावांनी मंजिरीची समजूत काढली. त्यानंतर दिनकरराव व सुलोचनाबाई मंजिरीच्या पाठीशी भक्कम उभ्या राहिल्या. सून म्हणून आलेली मंजिरी त्या घरची लेक झाली. काही दिवसांतच दिनकररावांनी आपल्या लेकीसाठी सतेजरावांचं स्थळ बघितलं आणि समाजाची कसली पर्वा न करता धुमधडाक्यात त्यांचं लग्न लावून दिलं. दिनकररावांनी स्वत: कन्यादान केलं. मंजिरीला सासू-सासऱ्याचं मोठं मन आठवल्यानंतर तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. त्यानंतर ती पाणी घेऊन घरी आली. आठवडाभरानंतरही मंजिरीचा पाय माहेरातून निघत नव्हता. ‘‘आई-बाबा काळजी घ्या. माझं माहेर तुमच्यामुळे टिकून आहे. तुम्ही माझे आई-बाबाच नाहीतर माझे देव आहात,’’ असे म्हणून ती दोघांच्या गळ्यात पडून रडू लागली. लेकीची पाठवणी करताना या दोघांनाही गहिवरून आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Updates : - देशभक्तीचा व्यापार केला जातोय- उद्धव ठाकरे

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT