Panchnama
Panchnama 
पुणे

भाईंचा ताफा ‘फास्ट’; आम्ही मात्र ‘टॅग’

सु. ल. खुटवड

‘फास्टॅग...फास्टॅग..’ टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याने आमच्याकडे पाहून दोनवेळा असं म्हटल्याने आमच्या रागाचा पारा चढला. आम्हाला फेसबुकवरही कोणी ‘टॅग’ केलं तरी आमच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत जाऊन, आम्ही त्याला लगेच ब्लॉक करीत असतो. इथंही हा कर्मचारी ‘फास्टॅग’ म्हणू लागल्याने आम्ही त्याला चांगलेच झापले.  

‘कसलं फास्टॅग...? फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्ट्राग्राम, ट्विटर हे वापरतोय ना. आता परत फास्टॅग वापरू का?’ आम्ही जोषात उत्तर दिले. टोलनाक्यावरील लोकांशी असंच बोलावं लागतं, असं माझ्या ओळखीतील एका राजकीय कार्यकर्त्याने आम्हाला सांगितलं होतं.
‘हे बघा, फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल भरावा लागेल.’ त्या कर्मचाऱ्याने सांगितले.
‘हे बघा, पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे गाड्या वापरणे आम्हाला परवडत नाही. त्यातून तुमचा दुप्पट टोल कोठून भरायचा? दुसरे रस्त्यावर एवढे मोठे खड्डे पडले आहेत. ते आधी भरा आणि मग टोल मागा.’’ आम्ही व्यवस्थित मुद्दे मांडले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘ते मला काही सांगू नका. आधी टोल भरा.’ त्या कर्मचाऱ्याच्या मदतीला आणखी दोघे आल्याने त्याचा आवाज चढला. त्यानंतर आमच्यात खडाजंगी चालू झाल्याने गोंधळ वाढला. 
‘हे बघा, दोन तासांपासून मी टोलनाक्याच्या रांगेत आहे. चार किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा गेल्या आहेत आणि तीन मिनिटांपेक्षा जास्त थांबावे लागल्यास टोल द्यायचा नाही, असा कायदा आहे.’ आम्ही ठणकावून सांगितले.
‘ठीक आहे. गाडी बाजूला घ्या. सर्विसिंग करावे लागेल.’ त्यातील एकाने सांगितले.
‘ए बघा, मी सर्विसिंगचा एकही रूपया देणार नाही. आधीच महागाई...’
‘साहेब, आमच्याकडून सर्विसिंग फ्री असते,’ असे म्हणून तो कर्मचारी मोठ्याने ‘सर्विसिंग’ असं ओरडला. त्याबरोबर पाच- सहा बाऊन्सर धावत आले व त्यांनी गाडी बाजूला घ्यायला सांगितली. त्यानंतर त्याने जवळच्या रूममध्ये आम्हाला नेले. ‘आम्ही सर्विसिंगचे पैसे देणार नाही,’ आमचे पालुपद चालूच होते. त्यावर बाऊन्सर गालातल्या गालात हसू लागले.
‘ए टोल का भरत नाहीस’? एका बाऊन्सरने आमची गचांडी पकडत म्हटले.

‘हे बघा. हे लोकशाहीच्या विरोधात असून, त्याचा आम्ही निषेध..’ आमचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आमच्यावर लाथा- बुक्क्यांचा वर्षाव झाला. बराचवेळ आमची धुलाई झाल्यानंतर ‘टोल भरणार का? आणखी सर्विंसिंग करू का? तीही अगदी मोफत...’ असे त्यातील एकजण म्हटल्यावर सगळेच हसू लागले. त्यावर आम्ही मानेनेच टोल भरण्यास होकार दिला. बळंबळं लंगडत आम्ही पैसे भरण्याच्या केबिनजवळ आलो. त्यावेळी तिथं लंगडत असलेले व तोंड सुजलेले सात- आठ जण रांगेत होते. ‘फ्री सर्विसिंग’वाल्यांची ती स्वतंत्र रांग होती तर ! ही रांग पुढे सरकत असतानाच तेथील अधिकारी, कर्मचारी व बाऊन्सरची धावपळ उडाली. ‘भाईंची तुरुंगातून सुटका झाली असून, त्यांच्या स्वागतासाठी गेलेल्या तीनशे गाड्या लवकरच येत आहेत. त्यांना टोलनाक्यावर एक सेकंदही थांबवू नका. उलट इतर गाड्यांना बाजूला सारून, त्यांना पुढे जाऊ द्या.’ अशा उद् घोषणा होऊ लागल्या. थोड्याच वेळात भाईंच्या गाड्यांचा ताफा आला.

मोठ-मोठ्याने हॉर्न वाजवत व भाईंच्या नावाने घोषणा देत, मोठ्याने आरडत- ओरडत या कार्यकर्त्यांनी टोलनाका डोक्यावर घेतला. पण कोणीही त्यांना अडविण्याच्या फंदात पडले नाही. उलट त्यांना मार्ग मोकळा करून देण्यात आला. वीस- पंचवीस मिनिटांत गाड्यांचा ताफा गेल्यानंतर आम्ही तेथील कर्मचाऱ्यांना म्हटले, ‘अहो, एवढ्या गाड्या टोल न भरता फुकट गेल्या. त्यांना ‘फ्री सर्विसिंग’ द्या की.’ त्यावर कोणी काही बोलले नाही. ‘सर्वसामान्य माणसांपेक्षा गुंडांनाच जास्त सन्मान मिळायला लागला की आपण अधोगतीच्या दिशेने प्रवास करतोय, असे समजावे’ असे स्वतःशीच पुटपुटत आम्ही दुप्पट टोल भरला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT