पुणे : पुरंदर तालुक्यात गेल्या चोवीस तासात तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच, आज आणखी तीन रुग्ण सापडले. त्यात कुंभारवळण येथील ग्रामपंचायतीच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
सासवड : पुरंदर तालुक्यात गेल्या चोवीस तासात तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा प्रकार धक्कादायक व चिंता वाढविणारा आहे. सासवडलगतच्या आंबोडी, सोनोरी व नीरा या गावातील हे मृत आहेत. या तीन रुग्णांच्या मृत्यूने तालुक्यातील कोरोनाबाधीत मृतांची संख्या तब्बल 25 झाली आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांमधून मृत्यूचे प्रमाण पावणेपाच टक्क्यांपर्यंत वाढल्याने काळजी वाढली आहे!
आंबोडी गावातील 60 वयाचा पुरुष आणि नीरा येथील 65 वयाची महिला कोरोनाबाधीत म्हणून मृत झाले. काल रात्री उशिरा सासवडनजिक सोनोरी गावातील कोरोनाबाधीत 70 वर्षीय महिला रुग्णालयात मृत झाली. आज रात्रीपर्यंत तीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. त्यातून तालुका रुग्ण संख्येत 531 वर पोचला. सासवड शहरात आज अहवाल न आल्याने रुग्ण संख्या 253 वर राहिली. आजच्या रुग्णात बेलसर, कुंभारवळण व नीरा प्रत्येकी एक- एक रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले. आजअखेर तालुक्यातील तब्बल 51 गावे कोरोनाबाधीत झाली आहेत, अशी माहिती तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी दिली.
खळद : कुंभारवळण (ता. पुरंदर) येथे आज येथील ग्रामपंचायतीच्या एका कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याने गावच्या ग्रामपंचायत कार्यालयातच कोरोनाने शिरकाव केल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, नऊ झाली आहे. त्यापैकी ४ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत, तर ५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
सरपंच अमोल कामथे यांनी सांगितले की, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे, मात्र हा ग्रामीण भाग असून, सध्या शेतात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती कामे सुरु असून पूर्णपणे गाव बंद ठेवणे शक्य होत नाही, अशावेळी ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहे. तेथील काही परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करीत असून, यातून इतर नागरिकांची व शेतकरी बांधवांची कोणतीही अडचण होणार नाही याचीही काळजी आम्ही घेत आहे.
रुग्ण आढळलेला परीसर निर्जंतुकीकरण करणे, रुग्णाला जर त्याच्या घरी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असेल, तर घरीच विलिनकरण करून त्याच्यावर त्याठिकाणी उपचार केले जात आहे व त्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा ग्रामपंचायतीच्या वतीने पुरविण्यात येत आहे. सध्या गावामध्ये सातत्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने संपूर्ण गावचे सर्वेक्षण करून केले जात आहे. ५५ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना त्यांची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्यांचेही वाटप करण्यात येत आहे, असे कामथे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.