माझा गाव, माझी जबाबदारी ः भूषण ताकवले, सरपंच, हरगुडे.
हरगुडे येथे लोकसहभागातून ग्रामविकासाची गंगा
मागील एक वर्षापासून हरगुडे गावामध्ये सरपंच म्हणून काम करत असताना आणि गावच्या विकासाचे वेगवेगळे विषय हाताळताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे लोकसहभागातून ग्रामविकास केल्यास खरोखर ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलू शकतो. यासाठी गरज आहे. ती गावातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची आणि आपल्या गावचा विकास साध्य करण्याची. विकासाची कामे करत असताना गावामध्ये प्रामुख्याने रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानभूमी, अंगणवाडी, शाळा खोल्या, समाज मंदिर ही सर्व भौतिक विकासाची कामे शासन कित्येक वर्ष करतं आलेलं आहे.
परंतु, त्यापलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने गावचा विकास साधायचा असेल तर त्यामध्ये, आपल्याला मानव विकासावर काम करणे गरजेचे आहे. ही कामे करत असताना गावातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य मिळाले पाहिजे, शाश्वत विकासामध्ये गावातील दारिद्र रेषेखालील कुटुंबांची संख्या कमी केली पाहिजे. त्यासाठी त्यांना उपजीविकेची विविध साधने गावामध्ये निर्माण करून दिली पाहिजेत. सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. गावातच दर्जेदार शिक्षण त्याच बरोबर लैंगिक समानता, गावातील सर्व लोकांसाठी शुद्ध पाणी, अपारंपरिक ऊर्जेचा वापर प्रत्येक नागरिकांसाठी उत्पादक स्वरूपाचा रोजगार तयार करणे, नावीन्यपूर्ण औद्योगीकरण करणे, सामाजिक व आर्थिक समानता ठेवणे, पर्यावरणाचा विकास करणे अशा विविध पैलूंवर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ज्यावेळी काम करतील, त्याच वेळी महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे खेड्याकडे चला हा उद्देश आपण साध्य करू शकू.
हरगुडे गावापासून नवीन हरगुडे रस्त्यासाठी आम्ही ४० लक्ष रुपये मंजूर करून आणले. त्याचबरोबर रुद्र गंगा नदी पुलावरील रस्त्यासाठी आणि संरक्षक भिंतीसाठी २० लक्ष रुपये, स्मशानभूमी सुधारणेकरिता तीन लक्ष रुपये, नवीन हरगुडे येथील स्मशानभूमीसाठी ६ लक्ष रुपये, नवीन हरगुडे अंतर्गत गटर योजना ५ लक्ष रुपये, नवीन हरगुडे येथे अंगणवाडीसाठी ८ लक्ष ५० हजार रुपये, प्राथमिक शाळा सीमाभिंतीसाठी ४ लक्ष रुपये, नाईक वस्तीमधील अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण करण्यासाठी तीन लक्ष रुपये, यादववस्ती येथील रस्त्यासाठी १८ लक्ष रुपये, गावातील सर्व घटकांना व्यायामाचा आनंद घेता यावा म्हणून ओपन जिम साठी ५ लक्ष रुपये असे जवळजवळ १ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मागील एक वर्षांमध्ये गावाला मिळाला आहे. त्यातील बरीच कामे आता प्रगतिपथावर आहेत. पुढील दोन महिन्यांमध्ये ही सर्व कामे पूर्ण होतील.
लोकसहभागातून आम्ही यादव वस्ती, ताकवले वस्तीच्या रस्त्यावर ४८० रोपांचे वृक्षारोपण केले. हरगुडे, पांगारे रस्ता हा वापरासाठी अतिशय खराब झालेला होता. यासाठी गावातील ग्रामस्थांनी वर्गणी जमा करून या रस्त्याचे काम पूर्ण केले. राज्य शासनाच्या मातोश्री पाणंद रस्ते विकास योजनेतून आम्ही ग्रामस्थांना त्यांचे शेतातील विविध रस्ते करून घेण्याचे आवाहन केलेले आहे. जलजीवन मिशनच्या अंतर्गत ताकवले वस्ती, दोन्ही यादव वस्त्या, ताकवले मळा या ठिकाणी पुढील वर्षांमध्ये प्रत्येक घराला नळाने पाणीपुरवठा करणार आहोत. हरगुडे-पांगारे रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पुढील आर्थिक वर्षाच्या आराखड्यामध्ये हा रस्ता घेण्यासाठी ग्रामपंचायतीचा पाठपुरावा चालू आहे. त्या कामाचा प्रश्नही पुढील वर्षी मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.
मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रोजगार हमीच्या योजनेच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी साधण्यावर भर देत आहोत. या राज्य शासनाच्या योजनेत समृद्ध गाव या संकल्पनेतून गावातील प्रत्येक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमीत कमी एक लक्ष रुपयाने वाढवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्या अनुषंगाने गावातील प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण आम्ही जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण केले. या कामी आम्हाला पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा खूप फायदा झाला. या काळात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातील सर्व कुटुंबांना भेटी देऊन रोजगार हमी योजनेतून कोणत्या योजना प्रत्येक कुटुंबाला देऊ शकतो, याचा आराखडा आम्हाला तयार करून दिला. हा आराखडा पुढील पाच वर्ष काम करण्यासाठी आम्हाला दिशादर्शक ठरणार आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम करताना गावातील भूमिहीन कुटुंब, शेतमजुरी करणारी कुटुंबे यांचे वर्गीकरण करून आम्ही त्यांना कुक्कुटपालन,
शेळीपालन, दुग्ध व्यवसाय यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पुरविणार आहोत. गावातील शेतकरी कुटुंबांना शेती करताना बारमाही पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शेततळे, ठिबक सिंचन, फळबाग लागवड, बांधावरील फळबाग लागवड अशा विविध योजनांचा लाभ आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देणार आहोत. राज्य शासनाच्या उमेद अभियानाअंतर्गत गावातील महिला बचत गटांचा ग्रामसंघ स्थापन करण्यात आलेला आहे. गावातील प्रत्येक महिलेला या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्यासाठी आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामसंघ एकत्रित काम करणार आहे. गावामध्ये राष्ट्रीय रोजगार हमी योजना, उमेद अभियान यांची एकत्रित सांगड घालून गावातील सर्व कुटुंबांना त्यांच्या व्यवसाय आणि शेतीसाठी पायाभूत सुविधा या माध्यमातून उभ्या राहणार आहेत.
मागील पाच वर्षांमध्ये हरगुडे गावच्या रुद्र गंगा नदीवर राज्याचे माजी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री नामदार विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून १४ सिमेंट बंधाऱ्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे, गावच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे. पिलाणवाडी तलावापासून परींचे गावा पर्यंत बंद पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणी देण्याची योजना मागील दोन वर्षांमध्ये सुरू करण्यात आली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी लढा देऊन हरगुडे गावच्या हक्काचे २३ एमसीएफटी पाणी मिळण्यासाठी खूप प्रयत्न केला. भविष्यात या उपलब्ध पाण्यावरील सर्व सिमेंट साखळी बंधाऱ्यांच्यामध्ये मत्स्यपालनाचा व्यवसाय गावातील युवकांना एकत्र करून सुरू करण्याचा आमचा मानस आहे.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे करण्यासाठी आम्ही पुढील आर्थिक वर्षामध्ये स्मशानभूमी ते पिण्याच्या पाण्याची विहीर या ठिकाणी संरक्षक भिंत करणार आहोत. त्याचबरोबर, यादव वस्ती वरून नवीन हरगुडे मध्ये येणारा रस्ता कार्यान्वित करण्यासाठी यादव वस्तीपासून ब्राह्मणमळ्यापर्यंत संरक्षक भिंत करण्याचे नियोजन आम्ही केले आहे. अतिवृष्टीच्या काळामध्ये बंधाऱ्याच्या कडेला असलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून माती वाहून जात आहे. त्या शेताच्या बांधाच्या कडेला आपण संरक्षक भिंतीच्या स्वरूपात जाळ्या तयार करणार आहोत.
१५ व्या वित्त आयोगातून निधी ग्रामपंचायतीला मिळालेला आहे. त्या माध्यमातून पारंपारिक ऊर्जा स्त्रोताचा वापर करून आम्ही सोलर नेट मीटरिंग करून ग्रामपंचायतीला पथदिवे अथवा पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीच्या मोटारीचे येणाऱ्या लाइट बिलाचा खर्च कमी करण्यासाठी काम करणार आहोत.
(शब्दांकन - दत्ता भोंगळे, सासवड शहर)
मोठे फोटो
१) वृक्षारोपण कार्यक्रमात ग्रामस्थांचा सहभाग.
२) हरगुडे गावात आयोजित केलेला संजय गांधी निराधार योजनेचा कॅम्प
३) गावातील अंगणवाडी च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपः
४)बचत गटाच्या महिलांना कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण दिले.
५) राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना सरपंच भूषण ताकवले.
आयकार्ड फोटो
१) भूषण ताकवले,
सरपंच.
२) अविनाश जाधव,
उपसरपंच.
३) विजय शिवतारे
माजी राज्य मंत्री.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.