मांडवगण फराटा, ता. ५ : ‘‘घोडगंगा साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची क्षमता फक्त माझ्यात आहे,’ असे ठाम वक्तव्य स्व. अजित पवार यांनी केले होते. आज त्यांच्या प्रयत्नांमुळेच आचारसंहिता संपल्यानंतर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासंबंधीची फाईल अंतिम मंजुरीसाठी पुढे सरकली असून, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) कर्ज मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे घोडगंगा कारखान्याचे पुनरुज्जीवन म्हणजे स्व. अजित पवार यांना खऱ्या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली ठरेल,’’ असे प्रतिपादन माजी आमदार अशोक पवार यांनी केले.
पिंपळसुटी (ता. शिरूर) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘कै. रावसाहेबदादा पवार यांनी आपल्या आयुष्यभराच्या कष्टातून उभा केलेला घोडगंगा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय व आर्थिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्व. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीने संबंधित प्रस्ताव दिल्ली येथे पाठविला असून, तो सध्या एनसीडीसीकडे अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. या प्रक्रियेत ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही सहकार्य केले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर फेब्रुवारीत कारखान्यासाठी आवश्यक निधी मंजूर होण्याची शक्यता आहे. कर्ज मंजूर झाल्यानंतर दोन महिन्यांत कामगारांचे प्रलंबित पगार, कारखान्याची देखभाल- दुरुस्ती, तसेच आगामी ऊसगाळपाचे नियोजन करण्यात येणार असून, मेअखेरीस कारखाना गाळपासाठी पूर्णतः सज्ज असेल.’’
‘घोडगंगा साखर कारखाना सुरू करू,’ असे खोटे आश्वासन देत विरोधकांनी कामगारांची फसवणूक केली. विधानसभा निवडणुकीपुरता कामगारांचा वापर केला. निवडणूक संपताच आश्वासने हवेत विरघळली आणि आज कामगार रस्त्यावर आला. वापर करणाऱ्यांना कामगार कदापी माफ करणार नाहीत. कामगारांनी भूलथापा ओळखून सुजाता पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे.
- महेंद्र काशीद, कर्मचारी, घोडगंगा साखर कारखाना
विरोधकांच्या सांगण्यावरून आम्ही घोडगंगा कारखान्याच्या प्रश्नावर गावोगावी फिरलो, हीच आमची कामगार म्हणून सर्वात मोठी चूक ठरली. कामगारांच्या संपाला जाहीर पाठिंबा देणाऱ्या नेत्यांनी तब्बल दीड वर्ष आमच्याकडे दुर्लक्ष केले. आज सर्व कामगारांची परिस्थिती बिकट आहे. घोडगंगा कारखाना अशोक पवार हेच सुरू करू शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे.
- महादेव मचाले, कामगार नेते, घोडगंगा साखर कारखाना
कामगारांच्या आंदोलनाला संपूर्ण मदत करण्यामागे विरोधकांचा केवळ राजकीय स्वार्थ होता, ही बाब आता कामगारांच्या लक्षात आली आहे. कारखाना दीर्घकाळ बंद राहिल्याने अनेक कामगारांची कुटुंबे रस्त्यावर आली, मात्र आता कामगारांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या असून, घोडगंगा साखर कारखाना येत्या काही दिवसांत अशोक पवार यांच्या ठोस प्रयत्नांमुळेच सुरू होईल.
- संदीप फराटे, कर्मचारी, घोडगंगा साखर कारखाना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.