आळंदी, ता. ९ : चऱ्होली खुर्द येथील तलावामध्ये सोमवारी (ता. ८) सायंकाळी सहा वाजता गणेश विसर्जनासाठी गेलेला बारा वर्षीय वारकरी विद्यार्थी पाण्यात बुडून मरण पावला. पवन ज्ञानेश्वर येडे (रा. चैतन्य बहू उद्देशीय वारकरी संस्था, आळंदी देवाची), असे त्याचे नाव आहे. आळंदी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत आळंदी पोलिसांनी माहिती दिली की, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आळंदी- वडगाव रस्त्यावरील राममंदिर पाठीमागील ब्रह्मचैतन्य बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेचे काही विद्यार्थी गणेश विसर्जनासाठी चऱ्होली खुर्द येथील साई गार्डन मंगल कार्यालयाजवळील तलावात गेले होते. या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने पवन येडे हा तलावात बुडाला. स्थानिकांनी तातडीने आळंदी पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर आळंदी नगरपरिषद अग्निशामक दलाचे कर्मचारी, तसेच अलंकापुरी आपत्कालीन संघाचे जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री दहा वाजेपर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र गाळ, चिखल व अंधारामुळे शोध कार्य थांबवावे लागले. यानंतर आळंदी पोलिसांनी पीडीआरएफ पथकाला पाचारण केले. जवानांनी शोध सुरू केला. रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले.
या घटनेने पुन्हा एकदा वारकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.