आळंदी, ता. १५ : विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट आणि मुसळधार बरसणाऱ्या पावसाच्या सरींनी आळंदी आणि परिसरात पाणीच पाणी झाले. शहरासह परिसरात सर्वदूर पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. अनेक ठिकाणी शेताशिवारात पाणी साचल्याने फुलशेती, बाजरी सोयाबीन पीक पाण्याच्या अतिप्रमाणामुळे धोक्यात आली आहेत.
रविवारी रात्रीपासून आळंदीसह चऱ्होली, धानोरे, सोळू, वडगाव, मरकळ, गोलेगाव वडमुखवाडी भागात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. सोबत पहाटेच्या सुमारास वीज चमकत होत्या. अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणीच पाणी वाहू लागले होते. सोळू, चऱ्होली भागात फूल शेतीमध्ये काहीसे पाणी साचले होते. तर सोयाबीन बाजरी पिकालाही धोका निर्माण झाला आहे.
आळंदी आणि परिसरातील गावात विजेचा लपंडाव सुरु आहे. गणपती उत्सवानंतर वीज जाण्याचे प्रमाण वाढले. परिणामी पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. मागील आठवड्यात तर वारंवार वीज जात असल्याने नागरिकांची वीज मंडळाच्या कारभाराबाबत नाराजी आहे.
आळंदी भागात नव्याने प्लॉटिंग विक्रीमुळे विकसक चऱ्होली, वडगाव, धानोरे, मरकळ, आळंदी भागात ओढे नाले बुजवत सुटले आहेत. यामुळे ठिकठिकाणी पाणी वाहून जाणारे नैसर्गिक स्रोत बंद झाले. परिणामी रस्त्यावर पाणी शेतात पाणी साचत आहे. महसूल विभागाने लक्ष देऊन ओढे नाले पुन्हा खुले करणे गरजेचे झाले आहे.