आळंदी, ता. ६ : आळंदी परिसरातील चाकण, धानोरे, मरकळ औद्योगिक भागात जाणाऱ्या जड वाहनांना शहरातून कार्तिक वारी कालावधीत सोमवार (ता. १०) ते गुरुवार (ता २०) प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने घातपात, गुन्हे प्रतिबंध करण्याकरता तात्पुरत्या स्वरूपात २०० हुन अधिक सीसीटीव्ही शहरांमध्ये बसविले जातील. भाविकांना इंद्रायणीकाठी मंदिर परिसरात प्रदक्षिणा रस्त्यांवर सूचना देण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनिक्षेपक लावले जाणार आहेत. या नागरी सूचना केंद्राचा एक नियंत्रण कक्ष आळंदी पोलिस ठाण्यामध्ये असणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली.
कार्तिक वारीच्या पोलिस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या तयारी बाबत माहिती देताना नरके म्हणाले, ‘‘आळंदी व दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये बुधवार (ता. १२) ते मंगळवार (ता. १८) या काळात वारीसाठी राज्यभरातून साडेचारशे दिंड्यांसह सुमारे पाच लाख वारकरी येतात. शहरातील ३८५ धर्मशाळा, मठ तसेच मोकळ्या जागेवर तंबूच्या माध्यमातून मुक्कामाची व्यवस्था करतात. आळंदी परिसरातील गावांमध्ये एक ते दीड लाख वारकरी वास्तव्यास असतात. पाच ते सहा लाख भाविकांच्या मालमत्ता तसेच जीविताचे संरक्षण करण्याची जबाबदारी आणि कायदा व्यवस्था प्रस्थापित ठेवणे हा वारीच्या काळात प्रमुख उद्देश आहे. वारी काळात प्रदक्षिणा रस्त्यासह प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या गर्दीमुळे भाविकांना त्रास होऊ नये यासाठी दिंडी व्यतिरिक्त अन्य वाहनांना बंदी करण्यात आली आहे. आपत्कालीन वाहतूक करणाऱ्या तसेच स्थानिक नोकरदार वर्गांच्या वाहनांना पोलिस ठाण्यांकडून वाहन पास परवाना दिला जाईल. दिंडी वाल्यांनी धर्मशाळेसमोर वाहने उभी न करता ती धर्म शाळेच्या आतील भागात उभी करावीत.
मंदिर परिसर छोटा असल्याने कार्तिक वारीतील मुख्य कार्यक्रमाकरिता देऊळवाड्यात कमीत कमी लोकांना प्रवेश देऊन त्याप्रमाणे पास वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाविकांनी यात्रा कालावधीत कोणत्याही संशयित वस्तूंना हात लावू नये, अशा वस्तू आढळल्यास जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा. शहरात लॉजवर अनैतिक व्यवसाय करणाऱ्या आणि दारू विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही नरके यांनी दिला.
दृष्टिक्षेपात
- वारी काळात प्रदक्षिणामार्ग, गोपाळपुरा, पुणे-आळंदी रस्ता, मरकळ रस्ता, वडगाव रस्ता या मार्गांवर हातगाड्यांना बंदी
- सहा हॉकर्स पथके राहणार कार्यरत
- मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती पाडण्याबाबत नगरपरिषदेकडे पत्रव्यवहार
- नो पार्किंगचे फलक रस्त्यावर लावण्यासाठी नगरपालिकेला सूचना
बंदोबस्तासह वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
कार्तिक वारी करता पाच सहाय्यक पोलिस अधीक्षक, २८ पोलिस निरीक्षक, शंभर पोलिस उपनिरीक्षक ७७५ पोलिस अंमलदार, सहाशे होमगार्ड, एनडीआरएफच्या दोन तुकड्या तसेच बीडीएसची दोन पदके बंदोबस्तासाठी मागवण्यात आली आहेत. आळंदी-चाकण रस्त्यावरील आळंदी फाटा, इंद्रायणी हॉस्पिटल, आळंदी-चिंबळी रस्त्याने केळगाव बायपास, आळंदी-वडगाव-घेनंद रस्त्यावर कोयाळी कमान, विश्रांतवड, आळंदी मार्गे रस्त्याने बाह्यवळणमार्गवर नाकाबंदी केली जाईल. नाकाबंदीच्या ठिकाणाहून केवळ दिंड्यांची वाहने वारी काळात सोडली जातील. इतर वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
प्रत्येक चौकामध्ये पोलिस मदत केंद्र
आळंदीत येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन आणि गर्दीचे नियमन करण्याकरता प्रत्येक चौकामध्ये पोलिस मदत केंद्र उभारली जाणार आहेत. घातपात विरोधी बंदोबस्त तयार केला असून बीडीएस स्क्वाड आणि वॉच टॉवर्स पोलिस यंत्रणेमार्फत गर्दीच्या नियंत्रणासाठी तसेच चित्रीकरण करण्यासाठी लावण्यात येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.