आळंदी, ता. १३ : पांडुरंग, नामदेव महाराजांच्या दिंड्यांबरोबर आलेल्या इतर दिंड्यांमुळे आळंदीतील रस्ते वारकऱ्यांनी फुलले आहेत. पुणे, नाशिक, सोलापूर जिल्ह्याबरोबर रायगड मराठवाडा भागातून अनेक दिंड्या आळंदीत पायी दाखल होत आहेत.
माउलींच्या संजीवन समाधी दिनानिमित्त भरणाऱ्या कार्तिक वारीसाठी ठिकठिकाणाहून आलेले भाविक ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसले आहेत. तर शहरामध्ये होत असलेल्या कीर्तन, पारायणामुळे वातावरण भक्तिमय झाले आहे. तीन दिवसांपासून भाविक आळंदीमध्ये येऊ लागले आहेत. अनेक जण स्वतःच्या मोटारीने तर कोणी एसटीद्वारे आळंदीत दाखल होत आहेत. आज सकाळपासून भाविकांचा ओघ हळूहळू वाढत होता. आळंदीत आल्यावर सर्वप्रथम इंद्रायणी काठी तीर्थस्थान आणि नंतर समाधी दर्शन घेऊन भाविक मुक्कामासाठी धर्मशाळा तसेच राहुट्यांमध्ये जात होते.
संतांचे दिंडी सोहळे एकेक करून आळंदीत येऊ लागले आहेत. दिवसभरात पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, आंबेगाव भागातून दिंड्या पोहोचू लागल्या आहेत. याचबरोबर रायगड, पालघर, नवी मुंबई भागातील दिंड्याही पोहोचत आहेत. देऊळवाड्यामध्ये माउलींच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. आजोळ घरातील दर्शन बारी वारकऱ्यांनी भरून गेली होती.
आळंदी पोलिसांच्या वतीने देऊळवाड्याचे महाद्वार, हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा, पान दरवाजा या ठिकाणी बंदोबस्त लावला होता. तसेच इंद्रायणी काठी आणि प्रदक्षिणा रस्त्यावरही पोलिसांचा बंदोबस्त आहे. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे डांबरीकरणाने बुजवण्याचे काम केले आहे. विशेष करून पुणे-आळंदी रस्ता आणि देहू फाटा ते चाकण रस्ता या भागामध्ये अनेक खड्डे होते, ते डांबरीकरणाने रात्री काम करून बुजवले. स्वतः मुख्याधिकारी माधव खांडेकर रस्ता सफाई आणि रस्त्यातील खड्डे बुजवणे तसेच दर्शन बारी या ठिकाणी जाऊन पाहणी करत होते.
नगरपरिषदेच्या वतीने गावठाणामध्ये पिण्याचे पाणी सोडण्यात आले होते. गावठाणात वारकऱ्यांची संख्या अधिक असल्याने आणि बोअरचे प्रमाण कमी असल्याने जादा वेळ आणि जादा दाबाने पाणी सोडल्याने भाविकांची सोय झाली. सायंकाळी बाबासाहेब देवकर यांचे वीणामंडपात कीर्तन झाले. तर रात्री गुरुवारची नित्याची पालखी काढण्यात आली. त्यानंतर वासकर महाराजांचे कीर्तन, धुपारती झाली.
आजचे कार्यक्रम
देऊळवाड्यामध्ये दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहा यावेळेत गंगू काका शिरवळकर,सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ धोंडोपंत दादा अत्रे यांचे कीर्तन होईल. रात्री नऊ ते ११ वासकर महाराजांच्या वतीने कीर्तने होणार आहेत. त्यानंतर रात्री साडेअकरा ते साडेबारा जागराचा कार्यक्रम होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.