आळेफाटा, ता.१६ : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील राहुल जगदीश जाधव हे २५ वर्षांपासून केळीचे उत्पादन घेत आहेत. मात्र, यंदा त्यांनी जैविक खतांचा वापर केला. यामुळे केळीची नैसर्गिक गोडी वाढली आणि चार एकरमध्ये ३० टनांचे भरघोस उत्पादन मिळविले. पहिल्या तोड्यात चार लाखांचा खर्च वजा जाता त्यांना दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
जाधव यांना आतापर्यंत सुमारे चाळीस टक्के उत्पादन मिळाले जून साठ ते सत्तर उत्पादन मिळणार आहे. एका घडाचे वजन जवळपास ३० ते ३५ किलो आहे. सध्या केळीस प्रतिकिलोस १८ ते २० रुपये बाजारभाव मिळत आहे. यापुढे बाजारभाव चांगला मिळाल्यास अजून तीन लाख रुपये नफा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
कुकडी डावा कालवा, कुकडी नदी तसेच पिंपळगाव जोगे धरणाच्या कालवा जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातून गेल्याने येथे ऊस, केळी, द्राक्षे आणि बागायती पिके घेतली जातात. जाधव वडिलोपार्जित जमिनीत केळीचे पीक घेत आहेत. यासाठी केळीची बाजारपेठ, औषध फवारणी तसेच विक्री व्यवस्थेचा अभ्यास करून त्यांनी चांगले उत्पन्न घेतले.
दरम्यान, राहुल यांचे वडील जगदीश जाधव, आई मीना, पत्नी स्वप्नाली यांची केळीचे उत्पादन घेण्यास मोलाची साथ मिळत आहे.
असे घेतले उत्पादन
१. शेतात २० ते २५ ट्राली शेणखत पांगविले
२. जमीन नांगरून सुमारे एक ते दीड महिना तापत ठेवली
३. शेत रोटरून त्यामध्ये सात बाय पाच फुटांच्या अंतरावर बेडने सरी काढली
४. जळगावहून जैन व पाटील बायोटेक या जातीची सुमारे ४७०० रोपे आणली
५. त्यांची पाच बाय सात फुटाच्या अंतरावर लागवड केली
६. संपूर्ण केळीच्या बागेसाठी ठिबक सिंचनचा वापर केला.
७. फळांच्या वजनाने झाडे पडू नये यासाठी बांबूचा आधार दिला.
पिंपरी पेंढार गावात सर्वात जास्त केळीचेच पीक घेतले जाते. या पिकासाठी जमीन काळी असावी लागते. रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा व जैविक औषधांचा वापर केल्याने एका घडाचे वजन जवळपास ३० ते ३५ किलो भरत आहेत. केळी खायला गोड लागत असल्याने व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी आहे.
-राहुल जाधव, केळी उत्पादक
मागील पाच वर्षांतील प्रतिकिलोचे बाजारभाव (रुपयांत)
२०२१...........१७
२०२२...........१४
२०२३...........१५
२०२४...........१८
२०२५...........२०
06834