आळेफाटा, ता. १९ ः उंचखडक (ता. जुन्नर) येथील शेतकऱ्यांनी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली होती. मात्र, वातावरणातील सततच्या बदलामुळे कांदा पीक पीळ पडून करपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उभ्या पिकात शेळ्या- मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे.
उंचखडक येथील प्रवीण कणसे, अनिल शेटे, संदीप शेटे, भाऊसाहेब कणसे, नीलेश कणसे या शेतकऱ्यांनी आपल्या २४ ते २५ एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. मात्र, वातावरणातील सततच्या बदलामुळे कांदा पिकावर प्रतिकूल परिणाम झाल्याने कांद्याचे पीक खराब झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, दोन ते अडीच महिने होऊनही कांद्याच्या वाढीस पोषक हवामान न मिळाल्यामुळे कांद्याच्या गाठीही तयार झाल्या नाही. वारंवार औषध फवारण्या करूनही काहीच उपयोग झाला नाही. लागवडीसह खते व औषध फवारणीसाठी झालेला एकरी एक लाख रुपये खर्च वसूल होणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मागील दोन वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे, तरी शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी अशी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अडीच महिन्याच्या कांदा पिकातून मशागत, मजुरी, बि- बियाणे, औषधे व खते यांचा झालेला खर्चही वसूल होणार नसल्याने आशेवर पाणी फिरल्याने अखेर वैतागून किमान मुक्या जिवांना तरी चारा होईल, या हेतूने कांद्याच्या पिकामध्ये शेळ्या- मेंढ्या सोडून दिल्या आहेत.
दरम्यान, आळेफाटा येथील उपबाजारात समितीत मंगळवारी (ता. १८) कांद्याची १९ हजार ९७३ कांदा पिशवीची विक्रमी आवक होऊन एक नंबर कांद्यास दहा किलोस १९० रुपये, दोन नंबर कांद्यास दहा किलोस १७० रुपये, तीन नंबर कांद्यास दहा किलो १५० रुपये व चार नंबर कांद्यास दहा किलोस मिळाला ५० ते १०० रुपये बाजार भाव मिळाला आहे.
07352