आळेफाटा, ता. १९ ः बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील रखमा बाळु जाधव यांनी वीस वर्षांपूर्वी एका गायीच्या आधारे सुरू केलेल्या दूध व्यवसायात आज प्रगती करीत यश संपादन केले आहे. रखमा यांनी दहावीची परीक्षा दिल्यानंतर पुढे शेती करण्याचे ठरवले. पंरतु फक्त शेती न करता जोडधंदा म्हणून दुध व्यवसायही सुरू केला. त्यावेळी पंधरा हजार रूपयांची एक जर्सी गाय त्यांनी खरेदी केली.
त्यानंतर रखमा यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आज त्यांच्याजवळ २७ जर्सी गाई तर १३ वासरे आहेत. यातील एका गायीची किंमत सत्तर हजार ते एक लाखाहून अधिक आहे. या सर्व गायांना लागणारे खाद्य तो त्याच्या शेतातच पिकवत आहे. प्रामुख्याने हत्ती गवत, मका, कडबा व गव्हाचा भुसा हे पशुखाद्य म्हणून वापरले जात आहे.
या गायांचे दूध काढण्यासाठी त्याने एक लाख चाळीस हजार रूपयांचे मिल्कींग मशीन आणले असून या मशिनीद्वारे एकाच वेळी चार गायांचे दूध काढता येते. आज दररोजचे २०० लीटर दूध त्यांच्या गोठ्यातून जात असून औषधोपचार, मजुर, मुरघास व पशुखाद्याचा खर्च वजा करता दररोज दुधाचे दीड ते दोन हजार रूपयांप्रमाणे महिन्याचे पंचेचाळीस ते पन्नास हजार उत्पन्न निघते. तसेच, महिन्याला तीन ट्रॉली शेणखत निघून त्याचा बारा हजार रूपये नफा अधिकचा मिळत आहे. दरम्यान, एका गायीवर सुरू केलेल्या दुध व्यवसायावर आज त्यांनी ट्रॅक्टर, शेतीची अवजारे घेतली आहेत. गावचे उपसरपंच म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.
वर्षभरात शंभर गायांचा गोठा तयार करणार असून यासाठी मुक्त गोठा करण्याची योजना आहे. गाई सांभाळण्यासाठी आई, पत्नी कविता, मुलगा तेजस, मुलगी श्रुती यांची मोलाची साथ मिळाली आहे.
- रखमा जाधव, शेतकरी