पारगाव, ता. ८ : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील रोडेवाडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी १५ जणांवर पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे रोहन विलास बोंबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. मागील तीन आठवड्याच्या कालावधीत याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एकूण तीन जणांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. २) रोडेवाडी फाटा येथे सायं ६.३० ते सोमवारी (ता. ३) मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंत विविध पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेगाव व शिरूर तालुक्यातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे बेल्हे- जेजुरी, तसेच रांजणगाव ओझर अष्टविनायक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या आदेश न मानता रस्त्याच्या मध्ये थांबून रस्ता अडवून लोकसेवेचा आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण १५ जणांवर पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस अंमलदार संजय यशवंत साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला तालुकाध्यक्षा पूजा वळसे, पारगावच्या सरपंच श्वेता ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे, निरगुडसरचे सरपंच रवींद्र वळसे, लोणीचे माजी सरपंच दिलीप वाळुंज, शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे, नरेश ढोमे, शरद बोंबे, सचिन बोंबे, भोलानाथ पडवळ, दामू अण्णा घोडे, विकास गायकवाड यांच्यासह व इतर ४ ते ५ जण (नावे माहीत नाही), यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात एकूण ५६ जणांचा बळी गेला, तोपर्यंत सगळे झोपले होते. कोणताही ठोस निर्णय घेतला जात नव्हता. ज्यावेळी रास्तारोको व आंदोलन उभे केले, त्यावेळी शासनाला जाग आली. असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी लढत राहणार. ५६ व्यक्ती ज्यावेळी मृत झाल्या, त्याला जबाबदार कोण? त्यातला गुन्हेगार कोण? बिबट्या की सरकार?
- देवदत्त निकम
बिबट्याच्या हल्ल्यांमुळे वारंवार जीवितहानी होत असताना या घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या. रास्ता रोकोसारखे आंदोलन केले. नागरिकांच्या मागणीला न्याय मिळण्यासाठी त्यांच्यासोबत राहणे हा गुन्हा ठरत असेल तर असे अनेक गुन्हे दाखल झाले तरी मी डगमगणार नाही. जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न बाजूला ठेवून आंदोलनकर्त्यांना आरोपी बनवले जात असेल तर लोकशाही मूल्ये धुळीला मिळवली जात आहे.
- अरुण गिरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.