पारगाव, ता. २३ : लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींची नांदी फाउंडेशन (पुणे) प्रोजेक्ट नन्ही कली यांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड अत्याधुनिक विज्ञान केंद्र येथे मोफत शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. यामध्ये एकूण ४५ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
विद्यार्थ्यांनी विज्ञान गॅलऱ्या, रोबोटिक्स विभाग, अंतराळ विभाग, सौरऊर्जा मॉडेल्स तसेच प्लॅनेटोरियमचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विज्ञानाची ओळख आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारी ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना देणारी ठरली.
कल्पक घर ठरले आकर्षणाचे केंद्र
क्षेत्रभेट दरम्यान विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्रातील ‘कल्पक घर’ या विशेष विभागाचीही भेट दिली. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या चारही क्षेत्रांचा अनुभव देणारे हे ‘कल्पक घर’ विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले. येथे ऊर्जा बचत, पाणी संवर्धन, स्मार्ट सेन्सर प्रणाली, सौर ऊर्जा उपयोग, दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे प्रयोग अशा विविध संकल्पनांची मॉडेल्स आणि प्रत्यक्ष क्रियाकलाप दाखविण्यात आले. ‘हाताने करून शिकण्याची’ ही पद्धत विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणारी व सृजनशीलता प्रोत्साहन देणारी ठरली. भविष्यातील विज्ञानाधारित जीवनशैलीची उत्तम झलक विद्यार्थ्यांना या कल्पक घरातून मिळाली. या क्षेत्रभेटीच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल देसले, विज्ञान शिक्षिका रसिका शिंदे, निदेशक-लक्ष्मी बोंबे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींचा लक्झरी बसने निःशुल्क प्रवास खर्च, चहा-नाश्ता व सुरुची भोजनाची व्यवस्था फाउंडेशनमार्फत मोफत केली.