आपटाळे, ता. ९ : चिंचोली काशीद (ता. जुन्नर) येथील ठाकरवस्तीवरील महिलेचा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. सीताबाई बबन जाधव (वय ६०) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ८) रात्री दहा ते मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. नक्की कोणत्या वन्य प्राण्याने हल्ला केला, याबाबत अद्याप स्पष्टता झाली नसून, बिबट्याचा हल्ला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रक्ताचा नमुना पुढील तपासणीसाठी हैदराबाद येथे पाठवण्यात येणार असून, त्यानंतरच कोणत्या प्राण्याने हल्ला केला याचे चित्र स्पष्ट होईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले. तर, वनविभाग आणि तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच खंडू काशीद यांनी केली आहे.
मूळ पारुंडे गावची रहिवासी असलेल्या सीताबाई बबन जाधव या चिंचोली काशीद येथे माहेरी आल्या होत्या. सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान घराबाहेर आल्यानंतर थेट सकाळी सहाच्या सुमारास दूध घेऊन जाणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना मृत अवस्थेत पाहिले. त्यानंतर ही घटना निदर्शनास आली. त्यांनतर ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, चिंचोली काशीद येथे गेल्या काही दिवसापासून बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील तीन दिवसांत जिवन बाबूराव काशीद यांच्या सहा शेळ्या, सविता महादू काशीद यांच्या २ शेळ्या, अश्पाक पटेल यांच्या २ शेळ्या, अशा एकूण दहा शेळ्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास बिबट्या फिरताना शालेय विद्यार्थी व काही ग्रामस्थांनी पहिले होते. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले आहेत.