आपटाळे, ता. १७ : जुन्नर तालुक्यातील १४४ ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विशेष सहभाग नोंदविला आहे. या अभियानाच्या अनुषंगाने या ग्रामपंचायत अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावर यांनी दिली.
जुन्नर तालुक्यामध्ये आजमितीस ११ हजार घरकुलांची संख्या मंजूर आहे. ही घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्मपद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. या मंजूर घरकुलांपैकी जे लाभार्थी स्वतः खर्च करू शकत नाहीत त्यांच्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालिका शालिनी कडू यांच्या प्रयत्नातून रोटरी क्लब पुणे यांच्याकडून ५०० गरीब लाभार्थ्यांसाठी एक लाख रुपयांचे साहित्य उपलब्ध करण्यात येणार आहे. रोटरी क्लब पुण्याचे सुशांत गुप्ता, परम निश्चय फाउंडेशन यांनी पहिल्या टप्यात तालुक्यातील १०० घरकुलांचा सर्व्हे पूर्ण केला आहे. या सर्व्हेनुसार डोंगरी दुर्गम भागामधील चिल्हेवाडी येथील सहा घरकुलांना रविवारी (ता. १६) साहित्य वितरित करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना टप्प्याटप्याने साहित्य वाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी सहायक गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर, सरपंच अनुसया भोईर, उपसरपंच नितीन भोईर यांसह ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.
02875