जुन्नर, ता. २६ : जुन्नर नगरपरिषदेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीचा पक्षाकडून आणि उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. निवडणुकीच्या या कालावधीत शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या जुन्नरच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा वावर वाढल्यामुळे या पथकातील कर्मचाऱ्यांची सुरक्षाच रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.
निवडणुकी वाहनातून पैशांची वाहतूक, अवैध दारू, शस्त्रे किंवा गैरप्रकार यांसारख्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी जुन्नर शहरात पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपळगाव सिद्धनाथ व पाडळी मार्गे जुन्नर शहरात येणाऱ्या रस्त्यावर माणिकडोह चौकात एक पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकात जवळपास तीन कर्मचारी तैनात आहेत; मात्र माणिकडोह चौक ते पाडळी रस्ता, पिंपळगाव सिद्धनाथ ते जुन्नर रस्ता व कुकडी नदीचा परिसर या भागात बिबट्याचा मुक्त वावर आहे. तर ज्या ठिकाणी हे पथक तैनात करण्यात आले आहे त्या ठिकाणी असलेल्या परिसरात अंधारसदृश परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये
अचानक बिबट्या समोर आल्यास अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हे पथक असलेल्या ठिकाणापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर बिबट्या निदर्शनास आल्याचे या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सांगितले.
2891