भुकूम, ता. १९ ः मुळशी तालुक्यात पाऊस लांबल्यामुळे भात काढणी अद्याप सुरू आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या उशीरा होत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामाचे वेळापत्रक कोलमडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
तालुक्यात दरवर्षी रब्बी हंगामातील पेरण्या एक महिन्यापूर्वी पूर्ण होत असतात. त्यामध्ये काठाणाची पिके हरभरा, मसूर, वाटाणा, वाल आदी पिकांचा समावेश असतो. तसेच, आक्टोबरपासून जूनपर्यंत बागायती पिके घेतली जातात. टोमॅटो, बटाटा, कांदा व भाजी पाल्याच्या रोपांची लागवड होत असते. आतापर्यंत रोपे उगवून व लावून थंडीच्या मोसमात चांगली वाढत असतात. दरम्यान, थंडी चांगली पडू लागली तरी पेरण्या अद्याप सुरू नाही, अशी परिस्थिती आहे.
यावर्षी पाऊस मे महिन्यात सुरू झाला, तो ऑक्टोबर अखेरपर्यंत उघडलाच नाही. भात पेरण्या उशीरा झाल्यामुळे लागवडी उशीरा झाल्या. पाऊस लांबल्यामुळे काढणी उशीरा सुरू झाली. भात काढणी होत असलेल्या खाचरांमध्ये अद्याप मोठी ओल आहे. त्यामुळे पेरण्या करण्यास उशीरा होणार होत आहे. त्यामुळे भाताप्रमाणे रब्बी हंगामाचे उत्पादन मिळण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
02806