भिगवण, ता. १९ : ढोल-ताशा, लावणी व संगीताच्या तालावर थिरकत... गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात भिगवण (ता. इंदापूर) येथे दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न झाला. सहा दहीहंडी मंडळाने उत्सव आयोजित केल्यामुळे येथील वातावरण गोविंदामय झाले होते. बारामती, इंदापूर येथील गोविंदांनी दहीहंडी फोडत चषकासह घसघशीत बक्षिसांची लयलूट केली.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रोहित शेलार मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी चषक, श्रीनाथ तरुण मंडळाच्या वतीने कॅबिनेट मंत्री चषक दुनियादारी ग्रुपच्या वतीने आरोग्यदूत दत्तात्रयमामा भरणे चषक, भिगवण युवा प्रतिष्ठान व एस.एस.पी. ग्रुपच्या वतीने कृषिमंत्री चषक, अनिकेत जमदाडे व करण थोरात मित्र मंडळाच्या वतीने येथे श्रीराम चषक दहीहंडी तर सिद्धार्थ ग्रुपच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यातील अनेक उत्सवास आमदार राहुल कुल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादीचे युवक नेते श्रीराज भरणे, बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, तुषार जाधव, ॲड. महेश देवकाते, प्रशांत शेलार, निखिल बोगावत, अनिल काळंगे आदींनी भेटी देत शुभेच्छा दिल्या. रशियन बेली डान्सरने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.