बारामती, ता. २९ : येथील गणवेश शिलाईच्या मुद्यावर कार्यालयाची प्रतिमा मलिन होत असल्याच्या कारणावरून बारामतीचे गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी ही नोटीस जारी केली.
बारामतीचे सामाजिक कार्यकर्ते पोपट धवडे यांनी बारामती तालुक्यातील गणवेश शिलाईच्या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. एकाच व्यक्तीकडून गणवेश शिलाई केल्याने नियमबाह्य पद्धतीने कामकाज झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर याबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.
या संदर्भात नाईकडे यांच्याशी संपर्क साधला असता, गटशिक्षणाधिकाऱ्यांना दोन दिवसात म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले असून, त्यांच्या खुलाशानंतर याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. या प्रकरणासंदर्भात आवश्यक ती चौकशी केली जाईल. यात चौकशीअंती जो निष्कर्ष प्राप्त होईल त्यानुसार कारवाई होईल, असे त्यांनी नमूद केले.