बारामती, ता. २१ : शहरातील विविध इमारती उभारताना कागदावर दाखविलेली व नंतर गायब झालेली पार्किंग नगरपरिषदेने शोधून काढावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील वाहतुकीच्या प्रश्नावर नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. यात सर्वात महत्त्वाची समस्या ही पार्किंगची आहे. दुचाकी व चार चाकी वाहने पार्किंग करण्यासाठी जागाच नसल्याने रस्त्यावर होणाऱ्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षात शहरात उभ्या राहिलेल्या इमारतींची पार्किंग नेमकी कोठे गायब झाली याची तपासणी नगरपरिषदेने युद्धपातळीवर करावी अशी मागणी आहे. इमारत उभी करण्यापूर्वी नगरपरिषदेला जो नकाशा सादर केला जातो, तो वास्तुविशारद अचूकपणे सादर करतात. इमारत पूर्ततेनंतर पूर्णत्व प्रमाणपत्र दाखल करताना खरोखरीच नगरपरिषदेचे अभियंता या इमारतीची पाहणी करून हे प्रमाणपत्र देतात का, संशोधनाचा विषय आहे. बहुसंख्य इमारतीत बेकायदा बांधकाम पार्किंगच्या जागेमध्ये गाळेउभारणी, या गाळ्यांची सर्रास केलेली विक्री, कायदा धाब्यावर बसवून नफेखोरीसाठी पार्किंग गायब करण्याच्या बाबी अनेक ठिकाणी झाल्या आहेत. बारामती नगरपरिषदेने जेथे पार्किंगची समस्या आहेत व ज्यांच्या दारात गर्दी होते अशा इमारतीची तातडीने पाहणी करावी व जेथे पार्किंग गायब आहे ते पुन्हा अस्तित्वात कसे येईल याची काळजी घ्यावी अशी बारामतीकरांची मागणी आहे. प्रायोगिक तत्त्वावर बारामती नगरपरिषदेने अशा काही इमारतींचे मंजूर आराखडे व सध्याची स्थिती यांची पाहणी केल्यास अनेक बाबी समोर येतील, असेही बोलले जात आहे.
अस्तित्वातील पार्किंगचा उपयोगच नाही
मंडईमध्ये भले मोठे पार्किंग उभारूनही त्याचा शून्य उपयोग आहे. सदोष पार्किंग उभारणी झाल्याने येथे कोणीही पार्किंग करण्यास धजावत नसल्याने या पार्किंगचा काहीच उपयोग होत नाही. याबाबतही काही दुरुस्ती करून हे पार्किंग कसे कार्यरत करता येईल हे पाहावे, जेणे करून गुणवडी व इंदापूर चौकातील ताण कमी होण्यास मदत होईल.
बारामती नगरपरिषदेने इमारतींची पाहणी करून पार्किंग कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. बेकायदा कामे करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
- ॲड. सचिन भुजबळ, नागरिक, बारामती