बारामती, ता. १२: न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यामुळे निवडणुकीची रंगतच कमी झाली होती. सध्या बारामतीत कडाक्याची थंडी पडत असल्यानेही प्रचारही काहीसा थंडावला होता. आता मात्र, पुन्हा नव्याने उमेदवारांनी जोमाने प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, बारामती नगरपरिषदेची निवडणूक येत्या २० डिसेंबरला होणार असून मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे.
विविध पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या रिक्षा गावभर फिरताना दिसत आहेत. काही ठिकाणी उमेदवारांनी पुन्हा पदयात्रा सुरू केल्या असून घरोघरी फिरून प्रचार सुरू केला आहे. मतदारांपर्यंत जाऊन त्यांना आपल्या पक्षाचे चिन्ह सांगत मतदानाचे आवाहन केले जात आहे. राज्यभरात सगळीकडे निवडणूक होऊन गेली; पण बारामतीची निवडणूक पुढे ढकलली गेल्याने बारामतीकरांचा विरस झाला होता. आता पुन्हा नव्या जोमाने उमेदवार, हितचिंतक व कार्यकर्तेही प्रचाराला लागल्याचे दिसत आहे.
आठ अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद
बारामतीत शुक्रवारी (ता. १२) आठ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. दिवसभर हवेत गारठा राहत असल्याने, पहाटे व रात्रीही कडाक्याची थंडी पडत असल्याने त्याचा प्रचारावरही परिणाम जाणवत आहे. उमेदवार व कुटुंबीयांनी एकगठ्ठा मते असलेल्या कुटुंबीयांकडे विविध कारणांनी जात प्रचार सुरू ठेवला आहे. सभा घेण्यापेक्षाही वैयक्तिक संपर्कावरच अधिक भर दिला जात आहे. आगामी काळात या परिसराचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही उमेदवार देताना दिसत आहेत.