बारामती, ता. २७ : येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख अजय ढवळे यांनी युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅमच्या जगप्रसिद्ध शेक्सपिअर इन्स्टिट्यूटमध्ये नुकतेच ऑनलाइन व्याख्यान झाले.
शेक्सपिअर साहित्याच्या अभ्यासात जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या संस्थेच्या व्यासपीठावर बारामतीसारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने आपले विचार मांडणे, ही महाविद्यालयासाठी गौरवाची बाब ठरली आहे.
इंडिजिनायझिंग शेक्सपिअर स्पीकर सिरीज (Indigenizing Shakespeare Speaker Series) अंतर्गत या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. शिन लिम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मालिकेत एकूण सहा व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा येथील अभ्यासकांसह प्रा. ढवळे यांनाही आपले संशोधन मांडण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
प्रा. ढवळे यांनी ‘‘रिक्लेमिंग व्हॉईस : दलित रेसिस्टंन्स अँड इंडिजिनस सोव्हेरिजन्टी इन द शॉडो ऑफ शेक्सपिअर’’ या विषयावर आपले सादरीकरण केले.