चाकण, ता. १४ : परिसरातील गावात व औद्योगिक वसाहत परिसरात रविवारी रात्रीपासून पहाटे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने चाकणच्या मुख्य मार्गावर, तसेच औद्योगिक वसाहतीतील विविध मार्गावर पाणी साचले. शेतात पाणी साचले. काही पिकात पाणी साचले. त्यामुळे कामगारांचे, तसेच शेतकरी, नागरिक, विद्यार्थी यांचे हाल. पावसामुळे काही खासगी शाळा बंद केल्या होत्या.
चाकण (ता. खेड) व परिसरात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. रात्री व पहाटे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. ढगांचा गडगडाट, तसेच विजांचा कडकडाट झाला. काही ठिकाणी दळणवळणावर परिणाम झाला. काही भागात चार ते पाच तास वीजपुरवठा ही खंडित झाला. त्यामुळे नागरिकांचे, शेतकऱ्यांचे हाल झाले.
काही खरीप हंगामातील पिके काढणीस आलेली आहेत. या पिकांचे या पावसाने नुकसान झाले. कोथिंबीर, मेथी या पालेभाज्यांचे नुकसान झाले, जी पिके काढणीस आलेली आहेत. माळरान भागात असलेल्या सोयाबीनला पावसाने दिलासा मिळाला. सखल भागातील जमिनीत सोयाबीनची पिके, बाजरी व इतर पिकांमध्ये पाणी साचले. ओढे, नाले यांना पूर आले.