चाकण, ता.२१ : चाकण नगरपरिषदेची स्थापना २०१५ला झाली. त्यानंतर या १० वर्षांच्या काळामध्ये नगरपरिषदेला तब्बल १२ मुख्याधिकारी लाभले आहेत. मोजक्याच मुख्याधिकाऱ्यांचा काळ एक वर्षभराचा राहिला नाही तर बाकीच्यानी सहा महिन्यांतच बदली करून घेतली. चाकण येथील वाढते प्रश्न , काही नागरिकांचे असहकार्य, अनेक वादाचे प्रश्न , काही नगरसेवकांची जबाबदारी घेण्याची नसलेली भूमिका, राजकीय नेत्यांची अपुरी पडत असलेली ताकद त्यामुळे मुख्याधिकारी प्रशासनातील काहीजण अक्षरक्ष:कंटाळलेले आहेत. त्यामुळे १० वर्षांत १२ मुख्याधिकारी हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. मुख्याधिकारी चाकणला का कंटाळताहेत हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला आहे .
चाकण (ता. खेड) येथील नगरपरिषद ‘ब’ वर्गातील आहे. या नगरपरिषदेचे उत्पन्नही दिवसेंदिवस वाढते आहे. चाकणची लोकसंख्या अगदी दीड लाखांवर गेल्याने समस्या वाढत आहेत आणि नगरपरिषद सोयी, सुविधा देण्यास मात्र अपयशी ठरत आहे, हे वास्तव आहे. नगरपरिषदेला विविध कामासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा निधी मिळतो; परंतु विकास कामे होत असताना नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक वेळा मानसिक त्रास सहन करावा लागतो. काही नागरिकांचे, राजकीय नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळते तर काही नागरिकांचे, नेत्यांचे , कार्यकर्त्यांचे अजिबात सहकार्य मिळत नाही.
विकास कामावरून वादविवाद सातत्याने होतात. अतिक्रमणे काढायची म्हटली तर कोणाची अतिक्रमणे काढायची आणि कोणाची ठेवायची हाही प्रश्न निर्माण होतो. मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहकार्य मिळत नाही मग ‘जैसे थे’ अवस्था राहते. ठेकेदारांमध्येही वाद विवाद होतात. विकास कामात कोण ना कोण अडथळा आणतोच हे ठरलेले आहे. चाकण नगरपरिषदेचा दहा वर्षे झाले तरी (डीपीआर) विकास आराखडा मंजूर झालेला नाही त्यामुळे अनेक कामे रेंगाळली आहेत. डीपीआरला कोणी ना कोणी अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे विकास कसा होणार हा ही प्रश्न आहे.
‘पदभार नको रे बाबा’
चाकण नगरपरिषद चा पदभार स्वीकारण्यासाठी दोन-तीन जणांनी यापूर्वी प्रयत्न केले, परंतु येथील परिस्थिती पाहिल्यानंतर ‘चाकण नगरपरिषदेचा पदभार नको रे बाबा’ असे म्हणत सहा महिन्यात, वर्षाच्या आत बदली करून घ्या त्यासाठी फिल्डिंग लावा अशी मुख्याधिकाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे हे चित्र आहे.
दबाव असेल तर सांगा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण येथील वाहतूक कोंडीबाबत प्रत्यक्ष पाहणी केली होती व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांच्याशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्याधिकारी डॉ.जाधव यांना तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का असे विचारले. दबाव असेल, काही अडचण असेल तर मला व पोलिस अधिकाऱ्यांना सांगा असेही बजावले होते.