चाकण, ता. २६ : भाम, संतोषनगर (ता. खेड) येथील शांताराम भोसले व संदीप सोमवंशी यांची भाजपच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. दोघांनाही पक्षश्रेष्ठींनी निवडीचे पत्र दिले आहे, अशी माहिती भोसले, सोमवंशी यांनी दिली. खेड तालुक्यातील ज्येष्ठ नेते शांताराम भोसले हे गेल्या तीस वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. भोसले यांनी दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पद, दहा वर्षे पंचायत समिती सदस्य, तीन वर्षे पंचायत समितीचे उपसभापती पद, पाच वर्षे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद, पाच वर्षे खरेदी विक्री संघाचे संचालक पद, साडेचार वर्षे खेड तालुका भाजपा तालुकाध्यक्ष पद, तीस वर्षे वाकी बुद्रुक गावच्या विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक पद आदी पदे भूषविली आहेत. खराबवाडी (ता .खेड) येथील युवा नेतृत्व संदीप सोमवंशी यांचीही भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. संदीप सोमवंशी यांनी याअगोदर भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्षपद तसेच शिरूर लोकसभेचे निवडणूक समन्वयक आदी पदे भूषविली होती.
पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदावर दोघांची निवड झाल्यानंतर दोघांचेही अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीनंतर भोसले, सोमवंशी यांनी सांगितले की, ‘‘तालुक्यात तसेच जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यावर अधिक भर देणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार येत्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट कशी होईल याकडे विशेष लक्ष देणार आहे.’’