खोडद, ता. १८ : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाल्याची घटना हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथे रविवारी (ता.१६) पहाटेच्या सुमारास घडली. हिवरे तर्फे नारायणगाव येथील सातपुडा मळ्यातील बाजीराव नथू काळे यांच्या घराशेजारी गायींचा गोठा आहे. रविवारी पहाटे बिबट्याने या गोठ्यात प्रवेश करून गाईवर हल्ला झाला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गायीचा रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने गायीचा मृत्यू झाला.या घटनेत बाजीराव काळे यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. वनविभागाने येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.