दौंड, ता. २१ : शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५० किलो गोमांस जप्त करण्यात आला आहे. राज्य शासनाने गायीला राज्यमाता-गोमातेचा दर्जा देऊन ११ महिने झाल्यानंतरही दौंड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल राजरोसपणे सुरू असल्याचे या कारवाईच्या निमित्ताने पुन्हा प्रकर्षाने पुढे आले आहे.
दौंड पोलिसांनी रविवारी (ता. २१) याबाबत माहिती दिली. शहरातील खाटीक गल्ली येथे रविवारी पहाटे सव्वातीन वाजता गोहत्या सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अंतर्गत असणार्या ११२ या क्रमांकावर पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर दौंड पोलिसांचे एक पथक खाटीक गल्ली येथे गेल्यानंतर त्यांना गोमांस आढळून आले. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी पोलिस अंमलदार महादेव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजिम मुस्तार कुरेशी ( रा. खाटीक गल्ली, दौंड) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत जप्त केलेल्या एकूण ५० किलो गोमांसचे एकूण मूल्य आठ हजार रुपये इतके असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. जप्त केलेल्या गोमांसाचे पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नमुने घेत राहिलेले गोमांस पोलिसांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले.