पुणे

दौंड- पुणे शटल- डेमूमध्ये प्रचंड गर्दी

CD

प्रफुल्ल भंडारी : सकाळ वृत्तसेवा
दौंड, ता. ९ : दौंड रेल्वे जंक्शनवरून पुण्याकडे जाणाऱ्या शटल व डेमू गाड्यांमध्ये बसण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने प्रवाशांना सलग पावणेदोन तास उभे राहून प्रवास करावा लागत आहे. इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयू) लोकल सेवा सुरू करण्याकरिता सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असतानाही विलंब केला जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे प्रवाशांना दाटीवाटीने उभे राहून प्रवास करावा लागला.
दौंड रेल्वे जंक्शनवरून दररोज सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी रवाना होऊन मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (मेमू) शटल पुणे स्थानकावर सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी दाखल होते. दौंड येथेच शटल भरून जात असल्याने सकाळी पावणेसात वाजल्यापासून दैनंदिन प्रवासी फलाटावर येऊन जागा पकडत आहेत. सध्याचा रेक अपुरा असल्याने पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी बुद्रुक, हडपसर येथून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागला.
बारामती रेल्वे स्थानकावरून सकाळी सव्वासात वाजता निघणारी बारामती- दौंड- पुणे डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (डेमू) ही दौंड रेल्वे स्थानकावरून ८ वाजून २५ मिनिटांनी रवाना होऊन पुणे रेल्वे स्थानकावर १० वाजून ५ मिनिटांनी पोचते. ही डेमू बारामतीवरूनच प्रवाशांनी भरून येत असल्याने दौंडसह केडगाव, यवत, उरुळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी, हडपसर येथील प्रवाशांना देखील अपुऱ्या रेकमुळे दाटीवाटीने उभे राहून प्रवास करावा लागतो. गर्दीचे प्रमाण इतके आहे की महिला व पुरुषांना गर्दीतून वाट काढत स्वच्छतागृहापर्यंत जाणेपण शक्य होत नाही. ज्यांच्याकडे साहित्य आहे, त्यांना तर अनेक अडथळे पार करीत प्रवास करावा लागत आहे.
दौंड- पुणे व दौंड- अहिल्यानगर- मनमाड लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होऊन १५ ऑक्टोबर २०१६ रोजी दौंड रेल्वे स्थानकावर मनमाड येथून हावडा- पुणे (आझाद हिंद एक्स्प्रेस) ही विद्युत इंजिन असलेली पहिली प्रवासी गाडी पहाटे दाखल झाली होती. विद्युतीकरण पूर्ण होऊन तब्बल नऊ वर्ष १ महिना पूर्ण झाल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने दौंड- पुणे- दौंड मार्गावरील प्रवाशांचे हित विचारात घेऊन प्रवासी गाड्या सुरू केलेल्या नाहीत.

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
डेमू आणि मेमूमधील प्रत्येक डब्यात क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी दररोज प्रवास करीत असताना मध्य रेल्वेच्या पुणे विभाग प्रशासनाने त्यांचा रेक बदलण्याच्या मागणीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. दौंड- पुणे मार्गावरून दररोज जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या, सुपरफास्ट, वंदे भारत, साप्ताहिक सुपरफास्ट आदी प्राधान्यक्रमावर असल्याने अनेक वेळा डेमू व मेमू गाड्यांना विलंब होतो. प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी मागणी करूनही प्रशासन त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे.

सलग साडेआठ तास गाडी नाही
दौंड येथून सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सुटणारी बारामती- दौंड- पुणे डेमू गाडी नऊ स्थानकांवर थांबे घेत पुण्याकडे जाते. त्यानंतर सायंकाळी थेट ५ वाजून २ मिनिटांनी सुटणारी दौंड- पुणे (डीईएमयू) ही दौंड- पुणे मार्गावर सर्व थांबे घेत मार्गक्रमण करते. तब्बल साडेआठ तास नसल्याने दौंड- पुणे मार्गावरील मधल्या स्थानकावरील प्रवाशांना नाइलाजाने राष्ट्रीय महामार्गावरून इंधन, वेळ, श्रम आणि पैशांचा अपव्यय करीत पुण्याच्या दिशेने जावे लागत आहे. दौंड ते पुणे दरम्यान सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत प्रवासी रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी प्रलंबित आहे.

दौंड- पुणे- दौंड येथे ये- जा करणाऱ्यांना आणि इतर कामासाठी प्रवास करणाऱ्यांना किमान २० ते ३० मिनिटे अगोदर स्थानकावर जागा पकडण्यासाठी यावे लागते. ज्येष्ठ प्रवासी, महिला भगिनी, विद्यार्थी तसेच दिव्यांग प्रवाशांना जागेअभावी खूप त्रास सहन करावा लागतो. तसेच शटलमधील आसन देखील बरोबर नाही. रेल्वे प्रशासनाने शटलचा रेक बदलावा व फेऱ्याही वाढवाव्यात.
- गणेश काकडे, दौंड

प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे. दौंड- पुणे रेल्वे खंडाला उपनगरीय दर्जा देत विद्यूत लोकल सेवा सुरू करावी.
- अभिषेक सोनवले, केडगाव, ता. दौंड

04274

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमध्ये जाहिरातबाजी! बाबा बंगालीनंतर भोजपुरी चित्रपटांच्या ऑडिशनचे फलक; नियमांना हरताळ

KVS Recruitment 2026: शिक्षण क्षेत्रात नोकरीची संधी! KVS मध्ये 987 स्पेशल एजुकेटर मेगा भरती लवकरच; जाणून घ्या वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया

KDMC Mayor: राजकीय नाट्यावरचा पडदा अखेर उघडला! एकनाथ शिंदेंचा 'हा' शिलेदार होणार महापौर; केडीएमसी महापौर–उपमहापौर पदाचे चित्र स्पष्ट

झी मराठीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? "असं नका करू" चाहत्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी नेते सुनील तटकरेंचा उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT