घोडेगाव, ता. ९ : घोडेगाव- कोटमदरा (ता. आंबेगाव) येथील डोंगराच्या टेकडीवर हेमंत सुनील मोहिते (वय २६, रा. सांगवी) या तरुणाने नाडीच्या साह्याने फाशी घेतली.
कोटमदरा येथील डोंगर माथ्यावर तेथील मेंढपाळ सोमवारी (ता. ८) सकाळी साडेअकराच्या दरम्यान शेळ्या चारायला गेला असता त्याला संबंधित घटना झाल्याचे निदर्शनास आले. त्याने गावचे पोलिस पाटील यांना संबंधित घटनेची माहिती दिली. त्यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यास कळविले. त्यानंतर घटनेच्या ठिकाणी पोलिस पथक आले. आपदा मित्र व रेस्क्यू टिमच्या साह्याने फाशी घेतलेल्या व्यक्तीस घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. यावेळी या व्यक्तिकडील खिशात फक्त एक गाडीची चावी मिळाली. दुसरे कोणतेही ओळख पटण्यासारखे काही न मिळाल्याने घोडेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश पवार, पोलिस अंमलदार भाऊ कोरके, जालिंदर राहाणे, वैभव आंधळे यांनी कोटमदरा परीसरातील सर्व नागरिकांना या व्यक्तीबाबत चौकशी केली, मात्र हा व्यक्ति या परिसरातील नसल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी संबंधित पथकाने घटनेच्या आजूबाजूला डोंगरावर किंवा दुसरीकडे कुठे काही मिळते का, याबाबत पाहणी करत असताना त्यांना घटनेपासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर एमएच १४ एनडी ८४३१ या क्रमांकाची मोटार सायकल उभी असल्याची दिसली.
संबंधित अज्ञात व्यक्तीकडे भेटलेली गाडीची चावी त्यास लावली असता गाडी चालू झाली. गाडीच्या नंबरवरून शोध घेतला असता संबंधित घटनेतील व्यक्तीची ओळख पटली. त्यांनी फाशी घेण्याचे कारण समजले नाही.