गराडे, ता. १९ : पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या भात काढणीला वेग आला आहे. यावर्षी उच्चांकी उत्पादन मिळेल असा कृषी खात्याचा अंदाज आहे. मात्र, रानडुकरांनी शेतात हैदोस घातला आहे. त्यामुळे उभी भात पिके जमीनदोस्त होऊन नुकसान होत आहे.
याबाबत पोखर (ता. पुरंदर) येथील शेतकरी व कोडीत देवस्थानचे विश्वस्त शेखर बडदे यांनी सांगितले की, ‘‘रानडुकरांनी आमच्या परिसरात हैदोस घातल्यामुळे उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माझे २० गुंठ्यावरील भात पीक रानडुकरांनी खाऊन फस्त केले आहे. पुढचे पीक वायाला जाऊ नये म्हणून तातडीने भात काढणी सुरू करावी लागली आहे. वीस गुंठ्यात साधारण २५ हजार रुपयांचे माझे नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. गतवर्षी ज्वारीच्या पिकाचे असेच रानडुकरांनी नुकसान केले होते. ऑनलाइन अर्ज भरूनही त्याची नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही.’’
रानडुकरांमुळे गराडे, चतुर्मुख महादेव परिसर, सोमुर्डी, दरेवाडी, थापेवाडी, रावडेवाडी, हनुमानवाडी, मठवाडी, तरडेवाडी, बांदलवाडी, कानिफनाथ डोंगर पायथा, बोपगाव, भिवरी, ऑस्करवाडी, कोडीत, पूर, पोखर, नारायणपूर, भिवडी, देवडी, केतकावळे, पानवडी या गावातील शेतकऱ्यांना सातत्याने रानडुकरांचा त्रास होत असतो, असे बोपगावचे शेतकरी प्रकाश फडतरे यांनी सांगितले.
पुरंदरच्या पश्चिम भागात डोंगराळ प्रदेश जास्त असल्यामुळे या ठिकाणी हे रानडुकरांचे कळप राहत आहेत. शेतकऱ्याचे पीक तयार झाले की, ही रानडुकरे त्याचे नुकसान करतात. रानडुकरे येताना १५ ते २० अशा संख्येने शेतावर हल्ला करतात. त्यामुळे या रानडुकरांनी अडवणे अवघड असते. तरी ज्या शेतकऱ्यांचे असे रानडुकरांच्या माध्यमातून नुकसान झालेले आहे. त्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी ऑनलाइन अर्ज करावा व वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
- योगेश नजन, वनरक्षक
पुरंदर तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे १४०६ एकर वर भात लागवड करण्यात आली आहे. यावर्षी पीक चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा उतार मिळेल, अशी आशा आहे. पुरंदरच्या इंद्रायणी तांदळाला सगळीकडे मोठी मागणी असते.
- श्रीधर चव्हाण, पुरंदर तालुका कृषी अधिकारी
12106