सर्वसामान्यांचा माउली...
हक्काचा माउली...
राजकारणात यशस्वी राजकीय व्यक्तिमत्त्वाची ओळख किंवा नेतृत्व नेहमी दोन प्रकारातून होते, एक म्हणजे राजकीय कार्य आणि कर्तृत्वातून निर्माण झालेले नेतृत्व व दुसरे म्हणजे जनमानसातून किंवा समाज मान्यतेतून निर्माण झालेले नेतृत्व. माजी आमदार अशोक पवार यांनी आपल्या विकासकामांच्या माध्यमातून राजकारणात ‘कार्यसम्राट’ ही पदवी मिळवली, तर स्व. माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी जनतेच्या मनावर राज्य करत ‘सर्वसामान्यांचे नेते’ ही पदवी मिळवली. आता यामध्ये भर पडली आहे, ती शिरूर- हवेलीचे आमदार माउली कटके यांची. जिथे राजकीय ओळख बनवायला अनेकांना आपले सामाजिक राजकीय आयुष्य खर्च करावे लागते. तिथे केवळ चार- पाच महिन्यांच्या प्रचारातच शिरूर हवेली मतदार संघाच्या सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाच्या जोरावर अधिराज्य गाजवून आमदार झालेले माऊली कटके हे ही ‘सर्वसामान्यांचा माऊली’ ही बिरुदावली लावण्यात यशस्वी झाले आहेत.
- संतोष लंघे, सरपंच, चव्हाणवाडी (ता. शिरूर)
शिरूर- हवेली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील नामांकित राजकीय दिग्गजांना आमदारकीचे वेध लागले होते. एका बाजूला राजकारणाची, समाजाची, तरुणांची, कार्यकर्त्यांची पक्की नस ओळखून असलेले अशोक पवार. विकास कामांच्या जोरावर त्यांनी मिळवलेली कार्यसम्राट पदवी, हक्काची व्होट बँक, साक्षात शरद पवारांचा त्यांच्यावर असलेला वरदहस्त यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांची उमेदवारी निश्चित होती, तर दुसऱ्या बाजूला गुडघ्याला बाशिंग बांधून तालुक्यातील इतर नेते वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. जिथे सावध पवित्रा घेऊन राजकीय आराखडे बांधले जात होते, तिथे माऊली कटके हे पायाला भिंगरी बांधून मोजक्या कार्यकर्त्यांसह तालुक्यातील प्रत्येक गट, गण, गाव, वाड्या वस्त्या, शेतकरी, कष्टकरी, मजुर या सगळ्यांच्या गाठी भेटी घेण्यात व्यग्र होते. बोलण्यात कसलाही गर्व नाही, वागण्यात कसलाही अहंकार नाही. प्रत्येकाशी संवाद साधताना त्यात आपलेपणा होता. विश्वास होता. त्यामुळे प्रत्येकाला ते आपल्याच घरातील एक व्यक्ती आहेत, हे बिंबवण्यात ते यशस्वी झाले. त्यात एका बाजूला उज्जैन येथील महाकाल देवाचे दर्शनाला त्यांचा प्रयोग न भूतो न भविष्याती असाच ठरला. महिला, तरुणाई, वयोवृद्ध अशा हजारो लोकांना त्यांनी उज्जैन वारी करून आणली. सगळ्या भाविकांची राहण्याची जेवणाची चोख व्यवस्था पार पाडली. या उज्जैन वारीत त्यांनी एक भाऊ, मुलगा, मित्र, सखा अशा सगळ्याच अष्टपैलू त्यांनी मनापासून पार पाडल्या. त्यामुळे तर त्यांनी लोकांच्या थेट ह्रदयात घर केले. आणि निवडणुकीच्या आधीच जनमतात आपली स्वच्छ प्रतिमा तयार व लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण करण्यात यशस्वी झाले होते. या एका खेळीने लोकांच्या भावनिकतेला हात घालून माउली कटके यांनी आपण तालुक्याच्या राजकारणासाठी राजकारणात नवखे असलो तरी आपणही लंबी रेस का घोडा आहोत, हे आपसूकच सिद्ध केले होते.
शिरूर- हवेली तालुक्याच्या राजकारणात आज ना उद्या आपल्यालाच आमदारकी मिळेल, अशी सुप्त इच्छा मनात बाळगून असलेल्यांना व त्यासाठी दहा- पंधरा वर्षांपासून राजकीय संघर्ष करणाऱ्यांना, प्रसंगी पक्ष बदलले, निष्ठा गहाण ठेवली तरीही त्यांचा भ्रमाचा भोपळा पुन्हा एकदा फुटला. कारण, राजकारणात कार्य आणि कर्तृत्वाबरोबर नशिबाची ही जोडी लागते. आणि हीच जोड माउली कटके यांना मिळाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून त्यांना उमेदवारीस नकारघंटा मिळाली. मात्र जनमत तयार झाल्याच्या वातावरणाचा फायदा घेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली. निवडणुकीच्या काळात एका बाजूला निर्माण झालेले मोठे जनमत, विरोधकांनी पुरवलेली रसद, हवेली तालुक्याने एकमुखाने दिलेला पाठिंबा, प्रत्येक सभेला, गावभेट दौऱ्याला, चावडी बैठकांना नागरिकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत गेला. रात्रीच्या दोन- दोन वाजेपर्यंत लोकं त्यांच्या स्वागतासाठी हजर राहू लागली. महिला, तरुण, वयोवृद्ध या सगळ्याच यात सहभाग असल्याने एक प्रकारे शिरूर हवेली मतदार संघाचे वातावरण माउलीमय होऊन गेले होते.
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तर नागरिक माउली कटके यांना मतदान करण्यासाठी स्वतःहून मतदान केंद्रावर जात होते. कसल्याही आमिषाला बळी न पडता मतदान करत होते. मतदारांचा उत्साह, उत्स्फूर्तपणा या निवडणुकीत प्रकर्षाने जाणवला. महिला, वृध्द, तरुण
हे सर्व आपले मतदान माउलींच्या पारड्यात टाकण्यासाठी पुढाकार घेत होते. मतदानाची टक्केवारी सतत वाढत होती. तालुक्यात विक्रमी मतदान झाले. निकालाच्या दिवशी पहिल्या फेरीपासून माउली कटके यांनी आघाडी घेतली, ती शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवली. १,९२,२८१ मतदारांनी मतांचे दान माउलींच्या पारड्यात टाकले. आणि शिरूर- हवेलीच्या आजवरच्या इतिहासात सगळ्यात ७४,५५० अशा विक्रमी मतांनी माउली निवडून आले. त्यांच्या विजयाच्या गुलालात संपूर्ण तालुका न्हाऊन निघाला. आपल्याच कुटुंबातील ‘माउली’ निवडून आला, हीच प्रत्येकाची भावना होती.
समोर तगडा, अनुभवी, मुरब्बी राजकारणी उमेदवार उभा असूनही लोकांच्या विश्वासातुन, प्रेमातून, आणि जनमाणसातुन निर्माण झालेले युवा नेतृत्व माउलींच्या रूपातून निर्माण झाले. ज्याला केवळ समाजाने स्वीकारले आहे, समाजाने मान्यता दिली आहे. म्हणूनच सर्वसामान्यांचा माऊली.... हक्काचा माऊली हे ब्रीद वाक्य माऊली यांना तंतोतंत लागू पडते.
(शब्दांकन, संदीप भोरडे, गुनाट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.