इंदापूर, ता. ६ : इंदापूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये एका अनोळखी व्यक्तीने हातचलाखी करून एटीएम कार्ड बदलून एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याची ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची केली.
याबाबत ज्ञानदेव सोपान दरेकर (वय ६४, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते मंगळवारी (ता. ५) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्र शाखा इंदापूर येथे आपल्या खात्यातील शिल्ल्क रक्कम तपासण्यासाठी एटीएममध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्या मागे उभा असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या एटीएम कार्डचा पिन पाहिला आणि बॅलन्स दिसत नाही, असे सांगून मदतीच्या बहाण्याने हात चलाखीने एटीएम कार्ड बदलले. कार्ड बदलल्याचे दरेकर यांच्या लक्षात आले नाही. तांत्रिक अडचणीमुळे बॅलन्स दिसत नसल्याचे समजून एटीएम केंद्रामधून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर प्रत्येकी १० हजार रुपये काढण्यात आलेल्याचे ५ एसएमएस आले. त्यांनी लगेच बँकेत जाऊन विचारणा केली असता त्यांच्याकडे असलेले कार्ड हे त्यांच्या खात्याचे नसून दुसऱ्याचे असल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी दरेकर यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इंदापूर पोलिस ठाण्यात संबंधित अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणूक, चोरी आणि फसव्या मार्गाने माहिती मिळवून वापरणे, या आरोपांखाली गुन्हा दाखल केला.