इंदापूर, ता. ३१ : ‘‘महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी रात्रंदिवस झटणारे, इंदापूर तालुक्याच्या विकासाची दूरदृष्टी असलेले दादा हरपल्याने राज्यासह इंदापूरचे मोठे नुकसान झाले आहे. ते कधीही न भरून निघणारे. दादांच्या आठवणी जपत आगामी काळात सर्वजण एकत्र येऊन दादांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूया,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले. यावेळी त्यांचा कंठ दाटून आला होता.
इंदापूर येथील नगरपरिषदेच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित पवार यांच्या शोकसभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, नगराध्यक्ष भरत शहा, प्रतापराव पाटील, हनुमंत कोकाटे, अरविंद वाघ यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भरणे म्हणाले, ‘‘तालुक्यातील लहान कार्यकर्त्यांनाही अजितदादा नावानिशी ओळखत. त्यांच्या अडचणी समजून घेत, कामे मार्गी लावत. मी मिटिंगला असो वा नसो, इंदापूरचा कोणताही प्रश्न असला तरी दादांनी तो सोडवला. ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल, याचा बारकावा त्यांच्याकडे होता. बारामतीसह इंदापूर शहरासाठी काय करता येईल, सातत्याने हा विचार करणारा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून असा नेता राज्याला पुन्हा मिळणे अशक्य आहे.’’
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा असा प्रसंग येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. काय बोलावे, श्रद्धांजली कशी अर्पण करावी, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. शब्दच सुचत नाहीत. महाराष्ट्रातील एक धडाडीचे नेतृत्व, कर्तृत्ववान नेता आपण गमावला. अजूनही विश्वास बसत नाही की दादा आपल्यात नाही. दादांचा स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावरची पकड अशी की एकदा काम सांगितले की झाले म्हणून समजा. आता यापुढे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, एकसंघपणे दादांच्या पाठीमागे पवार कुटुंबासाठी ताकदीने उभा राहणे.’’
जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, ‘‘अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, असा नेता राज्याला पुन्हा मिळणे अशक्य आहे. आगामी काळात दादांचा दृष्टिकोन, काम करण्याची पद्धत आपण अंगीकारुयात आणि पवार कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया.’’
नगराध्यक्ष भरत शहा म्हणाले, ‘‘घड्याळाच्या काट्यावर चालणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख होती. दादांच्या निधनाने एक सक्षम नेता या महाराष्ट्राने गमावला आहे. यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघू शकत नाही. नगरपरिषद निवडणुकीतील विजयानंतर दादांच्या भेटीप्रसंगी त्यांनी कोणत्याही संस्थेत काम करत असताना काटकसरीने आणि प्रामाणिकपणे काम करा. विकासाचे व्हीजन डोळ्यासमोर ठेवा, हा सल्ला मार्गदर्शक मानून इंदापूर शहराच्या विकासासाठी काम करू आणि त्या माध्यमातूनच दादांना श्रद्धांजली वाहू.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.